Lagnanantar Hoilach Prem Latest Promo: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागते. काव्या पार्थ देशमुखांनी दिलेलं ट्विन घड्याळ आत विसरते. ती आगीत घड्याळ घेण्यासाठी आगीत शिरते. ते पाहून घाबरलेली अनिषा पार्थला फोन करते. पार्थ लायब्ररीत येतो, आगीत शिरून काव्याला वाचवतो. मात्र स्वतः आगीत अडकतो.

आगीत अडकलेल्या पार्थचा जीव गुदमरतो. तसेच तो जखमी होतो. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येतो. रुग्णालयात काव्याला पार्थला भेटू देण्यासाठी मानिनी विरोध करते. पार्थची प्रकृती नीट असल्याने देशमुख कुटुंबीय जीवाला पार्थजवळ सोडून घरी येतात. पार्थसाठी जेवण घेऊन रुग्णालयात जाण्याबद्दल मानिनी व काव्यात वाद होतो. काव्याला जायचं असं पण मानिनी विरोध करते. याचदरम्यान पार्थ कोमामध्ये गेला, असा फोन जीवा करतो. हे ऐकताच काव्या रुग्णालयात जायला निघते, पण मानिनी तिला पार्थची शपथ देते. त्यानंतर देशमुख कुटुंबीय रुग्णालयात जातात.

पार्थ बरा व्हावा यासाठी काव्या हातात जळता निखारा घेऊन मंदिराला १०१ प्रदक्षिणा घालणार का? असं मानिनी काव्याला म्हणते. यावेळी ती वटपौर्णिमेला जीवा बरा व्हावा म्हणून नंदिनीने पायाला दुखापत होऊनही झाडाला फेऱ्या मारल्या होत्या ते उदाहरण देते. तसेच विक्रम देशमुख व स्वतःचं एक जुनं उदाहरण देते.

मंदिरात जाते काव्या

देशमुख कुटुंबीय रुग्णालयात गेल्यावर मानिनीचे शब्द आठवत काव्या मंदिरात जाते. याच मंदिरात आधी ती जीवाबरोबर आली होती. तेव्हाचा प्रसंग तिला आठवतो. नंतर ती पार्थसाठी प्रार्थना करते. पार्थला बरं कर अशी विनंती ती देवीसमोर करते. ती देवीआईच्या मंदिरात १०० दिवे लावते.

आता स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोत नंदिनी पार्थला म्हणते की ‘तुम्हाला काव्यासाठी जगावंच लागेल.’ दुसरीकडे काव्या, तुम्हाला शुद्धीवर यावंच लागेल पार्थ,’ असं म्हणते. नंतर काव्या दिवा लावते, पण वाऱ्यामुळे काही दिवे विझतात व एक दिवा पडतो. दुसरीकडे रुग्णालयात पार्थची प्रकृती आणखी बिघडते. तर मानिनी रुग्णालयात रडताना व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. आता पार्थ बरा होणार की नाही, ते या आठवड्यात पाहायला मिळेल.

पाहा प्रोमो

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’चा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. ‘काव्यार्थच्या प्रवासासाठी हा ट्रॅक खरा टर्निंग पॉइंट आहे, तो नीट एक्झिक्युट झाला पाहिजे. ऑनस्क्रीन व ऑफ स्क्रीन दोन्हीही. आता मालिका बघायला इंटरेस्टिंग होईल,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. काही जणांनी मात्र, मालिकेच्या या ट्विस्टवर टीका केली आहे.

प्रोमोवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘हे काय आहे… काहीही काय दाखवतात यार…या डॉक्टरांच्या डिग्री चेक करायला पाहिजेत आधी. अरे Heigh Co2 Environment मधल्या पेशंटला इतके कॅज्युअली घेतात की O2 लावायला सुद्धा हे Dyspnea ची वाट बघत बसतायत… बर स्वतःच सांगतायत Co2 फुफ्फुसात साठला असावा मग COPD च्या केसमध्ये व्हेंटिलेटर सोडून साधं O2 च मास्क का लावलंय आणि लावला होतं तर काढलं कशाला. या दिव्याच्या लॉजिकच्या नादात मेडिकल डिग्रीला व्हेंटिलेटर लावायची वेळ आलीये,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. त्याचबरोबर जीवा-नंदिनीला काव्या व पार्थसाठी साईडलाइन केलंय असं एका युजरने म्हटलंय.

‘किती ओव्हररिअॅक्ट, काहीही दाखवतात,’ ‘एक नंबर फालतू मालिका.. यात काहीही लॉजिक नसतं,’ ‘परत इतर मालिकांसारखा मेलोड्रामा’, ‘फालतू मालिका,’ ‘नक्की शुद्ध येणार…काळजी करू नका,’ अशा कमेंट्स या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.