‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेतील सगळीच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. सूर्या, सूर्याच्या चारही बहिणी, तुळजा, डॅडी, शत्रू, सूर्याचे मित्र काजू व पुड्या याबरोबरच, त्याचे वडील तात्या, एक नवीन आयडिया सांगू का? म्हणणारे त्याचे मामा, अशी आणि मालिकेतील इतर पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता पुन्हा एकदा या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. झी मराठी वाहिनीने लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून, त्यामध्ये तुळजा सूर्याच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळजा देणार सूर्यासमोर प्रेमाची कबुली?

‘झी मराठी वाहिनी’ने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, धनश्री, तेजश्री, भाग्यश्री, राजश्री आणि तुळजा दिवाळीची तयारी करीत आहेत. घराला सजवीत आहेत. तितक्यात सूर्या ‘हॅप्पी दिवाळी’, असे म्हणत घरात येतो. त्याच्या हातात गिफ्टच्या बॅग असून, तो त्याच्या बहिणींकडे येतो. त्यांच्यासाठी आणलेले नवीन कपडे पाहिल्यानंतर बहिणी आनंदित झाल्या आहेत. नंतर सूर्या तुळजाकडे येत, तिला साडी देत म्हणतो, “तुळजा हे तुझ्यासाठी.” तिच्यासाठी आणलेली साडी पाहून तुळजा खूश होते आणि ती तिच्या कल्पनेत हरवते. त्यानंतर पाहायला मिळते की, सूर्या जिथे अंघोळ करीत असतो तिथे तुळजा येते आणि त्याला म्हणते, “आज बायकोचा मान.” त्यानंतर ती त्याला उटणे लावते. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तुळजा सूर्याला पाडव्याच्या दिवशी ओवाळत आहे. यावेळी सूर्या लाडूचे कौतुक करतो. त्याच्या बहिणी त्याला सांगतात की, वहिनीने केले आहेत. त्यानंतर तेजश्री सूर्याला म्हणते, “दादा, वहिनीचा पहिला पाडवा आहे.” तिने तसे म्हणताच सूर्या तुळजाला ओवाळणीत पैसे देतो. ते पैसे ती भिशीमध्ये टाकते आणि सूर्याला म्हणते, “आजपासून तुझी स्वप्नं, तीच माझी स्वप्नं”

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “नियतीने जोडलेल्या नात्यामध्ये प्रेम फुलणार, यंदाची दिवाळी प्रेममयी असणार…”, अशी कॅप्शन दिली आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे तुळजाचे सूर्याबरोबरचे लग्न हे तिच्या मर्जीविरुद्ध झाले होते. आता मात्र ती त्याच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Video : लीलाच्या नव्या अवताराने सुनांना आश्चर्याचा धक्का; ‘नवरी मिळे हिटलरला’च्या प्रोमोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले, “आता येणार खरी मजा…”

आता तुळजा तिच्या मनातील भावना सूर्याला सांगणार का, सूर्याला तुळजाचे प्रेम कळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek aamcha dada tulja fall in love with tulja diwali special entertainment new promo out nsp