Amruta Deshmukh on atmosphere of the serial: अभिनेत्री अमृता देशमुख सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत काम करीत आहे. अभिनेत्री अभिनयासह तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते. आता तिने नुकतीच एक मुलाखत दिली.
कांचन अधिकारी यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल, बिग बॉस या रिअॅलिटी शोबद्दल याबरोबरच प्रसाद जवादे व तिच्या लव्हस्टोरीबद्दल तिने वक्तव्य केले. तसेच, मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला.
“इतकं रोबोटिक का…?
सर्व काही या यूट्यूब चॅनेलला अमृताने नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अमृताला विचारले गेले की, तू नाटक व मालिकांमध्येदेखील काम करतेस. तर नाटक, मालिका, सिनेमा यांच्यात काय फरक आहे? त्यावर अमृता म्हणाली, “मला वाटतं की, मालिकांमध्ये एका पॉइंटनंतर खूप मेकॅनिकल पद्धतीने काम होतं. म्हणजे प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. दिग्दर्शक, निर्माता यांच्यावर प्रेशर असतं. माझी खात्री आहे की, चॅनेलवरही प्रेशर असतं. पण, यातून असं होतंय की, मालिकांचं वातावरण हे आनंद देणारं कमी आणि तणाव निर्माण करणारं जास्त आहे.”
तणाव निर्माण होतो म्हणजे नेमकं काय होतं? यावर अमृता म्हणाली, “दिग्दर्शकाला वाटतं की, त्यांनी एका दिवसात २२ सीन लावलेत. मी कसं पूर्ण करणार आहे? ड्रेसवाल्यांचं असं होतं की, तुम्ही आज सकाळी सांगताय की, आज आपण प्रोमो शूट करणार आहोत आणि तुम्हाला काही सणांचं शूट करायचं आहे. तर, ऐन वेळी मी कसं मॅनेज करू? कलाकारांना असं होतं की, तुम्ही मला शिफ्ट वाढणार आहे, हे अगोदर सांगितलं नाही. मी काही वेगळे प्लॅन केले होते. “
“निर्माता म्हणतो की मी काय करू, मला चॅनेलनं सांगितलं आहे. चॅनेल म्हणतं की, आपण हे करायलाच पाहिजे. कारण- त्यांना कळलेलं असतं की, दुसऱ्या चॅनेलमध्ये एक महाएपिसोड येतोय. तिथे एक महालग्न होतंय, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. नाही तर मग आपण मागे पडू. तर, या सगळ्यात कलाकार एक छोटं प्यादं असतं.”
“मला असं वाटतं की, फार कमी वेळा खूप आनंद मिळतो. शेवटी माणसं त्या त्या दिवसातून आनंद शोधून काढतात. कोणी १०० टक्के दु:खी राहू शकत नाही; पण कुठेतरी हे बदलायला पाहिजे. आपण कलेच्या क्षेत्रात आहोत. इतकं रोबोटिक का होत चाललेलं आहे?”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, अमृताच्या ‘लक्ष्मी निवास’मधील सई या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.