Zee Marathi Awards 2025 : ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना खास सरप्राइज मिळणार आहे. या सोहळ्यात हर्षदा यांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील खास व्यक्ती आली होती. त्यांच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण आहे? पाहुयात…

हर्षदा खानविलकर गेल्या काही महिन्यांपासून ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे चर्चेत आहे. त्यांनी साकारलेल्या लक्ष्मीच्या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना खास पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार कोणता असेल याचा उलगडा येत्या ११ आणि १२ ऑक्टोबर होईल. मात्र, यादरम्यान त्यांना भेटण्यासाठी एक खास व्यक्ती आली होती. ती म्हणजे त्यांची धाकटी बहीण अर्चना. बहिणीला पाहताच हर्षदा यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांनी एक भावनिक आठवण सर्वांना सांगितली.

हर्षदा खानविलकर सांगतात, “अर्चना माझी धाकटी बहीण आहे. आम्ही लहान असताना आमच्यात फार बरे संबंध नव्हते. पण, हळुहळू परिस्थिती फार बदलली. आम्ही दोघींनी मिळून आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दु:ख पचवलं. माझे वडील गेले…त्यानंतर अर्चना आणि मी एकमेकांवर खूप जास्त अवलंबून राहायला लागलो.”

“आता अर्चना माझ्यासाठी बहीण आहे, लेक आहे…कधीकधी ती माझी आई होते आणि आता तर ती माझी सर्वात जवळची मैत्रीण झालीये. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने मला आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गिफ्ट दिलंय…ते गिफ्ट म्हणजे तिचा मुलगा. त्याला मी माझा ‘बुढापे का सहारा’ म्हणते. त्याच्यासारखं मौल्यवान गिफ्ट मला कधीच कुणी देऊ शकणार नाही.”

‘झी मराठी’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, हर्षदा यांच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. एकत्र कुटुंब जपणारी, आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करणारी, नवऱ्याच्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे साथ देणारी अशी या लक्ष्मीची भूमिका आहे.