‘झी मराठी’ची ‘लक्ष्मी निवास’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामधील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातील शेंडेफळ म्हणजेच जान्हवीचा भव्यदिव्य लग्नसोहळा मालिकेत नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. जान्हवीची व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगावकरने साकारली आहे. तिने नुकताच तिच्या कास्टिंगचा अनुभव सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिव्या म्हणाली, “लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझं कास्टिंग सर्वात शेवटी झालं होतं. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा असा आहे की, मला ऑडिशनला बोलावण्यात आलं. मी ऑडिशनही दिली, मग मला कॉल आला की, ९९ टक्के तुमचं सिलेक्शन झालंय असं दिसत आहे. हे सर्व झालं पण, अजून माझं कास्टिंग कन्फर्म झालं नव्हतं… आणि मला दुसऱ्याच दिवशी ‘लक्ष्मी निवास’चा पहिला टीझर आऊट झालेला दिसला. ज्यात एक फॅमिली फोटो दाखवला गेला होता. त्यात अक्षया देवधर क्लिअर दिसत होती आणि जान्हवीचं पात्र आहे तिथे ही एक मुलगी दिसली, तेव्हा वाटलं की काही गोष्टी जुळल्या नसतील म्हणून आपलं कास्टिंग नाही झालं. पण मी टीझर पाहून खूप आनंदी झाले कारण तो खूप छान दिसत होता.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “थोड्यावेळातच मला निर्माते सुनील भोसले यांचा कॉल आला… मी आधी त्यांचं अभिनंदन केलं कारण, माझा असा गैरसमज होता की, माझं कास्टिंगच झालं नाहीये. तेव्हा ते म्हणाले की तूच जान्हवी आहेस, आम्ही प्रोमोसाठी फक्त एका मुलीला बोलावले होते. अशा पद्धतीने माझं कास्टिंग झालं. जसं प्रत्येक कुटुंबामध्ये एक सदस्य खास असतो तसंच ‘लक्ष्मी निवास’मध्ये आहे. मी हर्षदा ताईला आधीपासून ओळखते, तिच्याबरोबर काम करण्याची फार इच्छा होती आणि ती आता पूर्ण होत आहे. लहानपणापासून मी तिला स्क्रीनवर बघत आली आहे. आता माझ्या दोन फॅमिलीस आहेत. एक रिअल लाईफ फॅमिली आहे आणि एक रीललाईफ फॅमिली आहे ‘लक्ष्मी निवासची’.”

जान्हवी ( Lakshmi Niwas )

“मला आजही शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय… मी टीममध्ये सगळ्यात शेवटी आले आणि त्यादिवशी मी सर्वात आधी अक्षयाला म्हणजे भावनाला भेटले कारण, आम्ही दोघी व्हॅनिटी शेअर करत होतो. तिची अशी प्रतिक्रिया होती की… “अच्छा फायनली जान्हवी तू करतेयस का? आता शूटिंग सुरु होईल कारण बरेच दिवसांपासून जान्हवीचं कास्टिंग राहिलं होतं आणि खूप मुली यायच्या जान्हवीच्या भूमिकेसाठी पण काही जमत नव्हतं. बाकी सगळ्या टीमला भेटले तेव्हा त्यांचं पण असंच मत होतं की आता ही आली आपलं कुटुंब पूर्ण झालं…आता शूटिंगला सुरुवात होणार. मला जान्हवीचा लूकही फार आवडला. जान्हवीसाठी अनेक लूक टेस्ट सुद्धा झाल्या होत्या. आमची कॉस्ट्यूम डिझायनर आहे तिने खूप मेहनत घेतली आणि जान्हवीच्या लूकसाठी हे ड्रेस खास बनवून घेतले. जान्हवी कॉटनचे फ्लोर लेन्थ ड्रेसेस, विथ पफ स्लिव्हस वापरते. मला कॅमेरासमोर ते मिरवायला मिळतात याचा आनंद आहे आणि मुलींना असे ड्रेस खूप आवडतात.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi niwas fame jahnavi aka divya pugaonkar shares her casting experience for the serial sva 00