Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना आणि सिद्धूच्या लग्नानंतर सिंचना रागावून घर सोडून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. भावनाने मुद्दाम आपल्या भावाला म्हणजेच सिद्धूला स्वत:च्या जाळ्यात ओढलं असा आरोप सिंचनाने केलेला असतो. घर, संसार, नवरा हा कसलाही विचार न करता सिंचना माहेरी निघून जाते. गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी गाडेपाटलांच्या घरात राहत असल्याचं पाहायला मिळत होतं.
मात्र, आपल्या धाकट्या सुनेला काहीही करून घरी परत आणायचं या आशेने लक्ष्मी आणि श्रीनिवास गाडेपाटलांच्या घरी जातात. तिथे अपेक्षेप्रमाणे सिद्धूची आजी त्या दोघांचा अपमान करते आणि सिंचना सुद्धा सासरी परत येण्यास स्पष्ट नकार देते. पण, सिद्धू शक्कल लढवून या सगळ्यातून मार्ग काढतो आणि सिंचना आजीचं जराही न ऐकता सासरी परतण्याचा निर्णय घेते.
सिंचना घरी आल्यावर हरीश आणि ती सुखाने संसार करतील असं लक्ष्मीला वाटत असतं. पण, असं काहीच घडत नाही. सिंचना घरात आल्यावर वेगळं होण्याची अट ठेवते. मी आणि हरीश आमचा संसार वेगळा करू असं ती ठामपणे सासूबाईंना सांगते. यानंतर सिंचना आणि संतोष यांच्यात मोठा वाद होतो. मोठ्या दीराशी भांडण झाल्यावर सिंचना या घराचे दोन भाग करा असं सगळ्या कुटुंबीयांना सांगते. अर्थात सिंचना आणि संतोष हे दोघेच घराच्या वाटणीला कारणीभूत ठरणार आहेत.
सिंचनाने घराच्या वाटणीचा विषय काढल्यावर स्वार्थी-कपटी संतोष मनातल्या मनात खूश होतो आणि मला घराच्या वाटण्या चालतील असं म्हणतो. यानंतर संतोष सर्वप्रथम घरातील सोफ्यावर माझा हक्क आहे असं सांगतो. यानंतर सिंचना टेबल स्वत:कडे घेते, नंतर टेबलफॅन आणायला जाते. वस्तूंच्या वाटण्या करूनही दोघांचा वाद मिटत नाही. शेवटी सिंचना आणि संतोष मोठा दोरखंड घेऊन घराचे दोन भाग करायला जातात.
सिंचनाचा अरेरावीपणा पाहून हरीशचा संयम सुटतो आणि तो बायकोवर प्रचंड संतापतो, आता पुरे झालं हे सगळं बास कर असं तो सिंचनाला सांगतो. घरातील हे वाद, डोळ्यासमोर होणाऱ्या घराच्या वाटण्या पाहून लक्ष्मी हतबल होते; तिचे डोळे पाणावतात.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ११ ऑगस्टपासून हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता घराची वाटणी लक्ष्मी रोखू शकेल का? या सगळ्यातून ती नेमका काय मार्ग काढणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचे हे विशेष भाग प्रेक्षकांना रात्री ८ ते ९ या वेळेत भाग पाहायला मिळणार आहेत.