Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धू-भावनाचं प्रेम बहरत जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर, दुसरीकडे जयंतला कंटाळून जान्हवीने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचं पाहायला मिळालं. जान्हवी आपल्याला सोडून गेली या धक्क्याने जयंत प्रचंड अस्वस्थ होतो. याचबरोबर विश्वाला सुद्धा आपली जिवलग मैत्रीण कोणत्यातरी संकटात सापडल्याची जाणीव होते.
जान्हवी गरोदर असल्याने प्रत्येकाला तिची खूप काळजी वाटत असते. जानू आई होणार असल्याने पहिला दिवाळसण तिने माहेरी साजरा करावा अशी लक्ष्मीची इच्छा असते. त्यामुळे ती जयंतला फोन करून जान्हवीला घरी घेऊन या असं सांगते. पण, आपली बायको आपल्याला कंटाळून सोडून गेली हे कोणत्या तोंडाने सासूबाईंना सांगायचं अशा विचारात जयंत असतो.
आता तो स्वत: दळव्यांच्या घरी जाऊन जान्हवी सोडून गेल्याची कबुली लक्ष्मीसमोर देणार आहे. जयंत म्हणतो, “आई…जानू नाहीये. ती आपल्याला सोडून गेली…I Lost Her आई” हे ऐकताच क्षणी लक्ष्मी जयंतच्या कानशिलात लगावते. आता जान्हवी गेल्याचा धक्का लक्ष्मी-श्रीनिवास कसा सहन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता जान्हवी मालिकेत पुन्हा कधी येणार? जान्हवी परतल्यानंतर तिची पहिली भेट कोणाशी होईल? विश्वा आपल्या मैत्रिणीला शोधण्यात यशस्वी होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळतील.
दरम्यान, अनेकांनी या अपघातात जान्हवी वाचेल पण, तिला भूतकाळ आठवणार नाही असा अंदाज व्यक्त केला आहे. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. याचबरोबर श्रीकांतच्या अपघाताचा गुन्हा वेंकीने त्याच्या अंगावर घेतलेला असतो. त्यामुळे जेलमध्ये वेंकीला भावना-सिद्धू कसे सोडवणार? यामुळे सिद्धू-भावनाच्या नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
