Meghan Jadhav & Anushka Pimputkar Kelvan : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मेघन जाधवने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. मेघन या महिन्यात लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरशी लग्न करणार आहे.

मेघन-अनुष्काच्या लगीनघाईला आता सुरुवात झाली आहे. या दोघांचं केळवण ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या संपूर्ण टीमने थाटमाटात केलं आहे. मेघन-अनुष्काच्या केळवणासाठी संपूर्ण टीम माजघर या पारंपरिक रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. याठिकाणी सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.

मेघन-अनुष्काचं औक्षण करून सर्वप्रथम त्यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर जयंतने मालिकेच्या टीमबरोबर अनुष्काची ओळख करून दिली. गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट करून त्यावर या दोघांसाठी जेवणाचं ताट सर्व्ह करण्यात आलं होतं. तर, केळीच्या पानावर ‘मेघन अनुष्काचे केळवण’ असं सुंदर अक्षरात लिहून विशेष सजावट करण्यात आली होती.

मेघनने होणाऱ्या पत्नीला पहिला घास भरवताना अगदी बॉलीवूड स्टाइल हटके उखाणा घेतल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता म्हणतो, “अनुष्का तुझं नाव घेतो… तूच माझी मस्तानी आणि तूच माझी काशी” यानंतर उपस्थित सर्वांनीच जल्लोष केला. तर अनुष्का सुद्धा मेघनचा उखाणा ऐकून खूपच इम्प्रेस झाल्याचं पाहायला मिळालं. तिने उखाणा ऐकताच ‘ओह माय गॉड’ अशी प्रतिक्रिया दिली.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेची संपूर्ण टीम या केळवणाला उपस्थित होती. हर्षदा खानविलकर ( लक्ष्मी ), कुणाल शुक्ल ( सिद्धू ), अक्षया देवधर ( भावना ), दिव्या पुगावकर ( जान्हवी ), मीनाक्षी राठोड ( वीणा ), निखिल राजेशिर्के ( संतोष ), अनुज ठाकरे ( हरीश ), महेश फाळके ( वेंकी ), विनिता शिंदे ( शांता ) तसेच या कलाकारांच्या कुटुंबीयांची झलक सुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

शेवटी मेघन व अनुष्काने केक कापून संपूर्ण टीमसह आनंद साजरा केला आणि यानंतर हर्षदा खानविलकरांनी या दोघांना ‘लक्ष्मी निवास’च्या टीमकडून खास भेटवस्तू सुद्धा दिल्या.

दरम्यान, या व्हिडीओवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘लक्ष्मी निवास’मधील कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहेत. तसेच मेघनला या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.