Priya Marathe Husband Shantanu Moghe : अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्टला मीरारोड येथील राहत्या घरी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झालं. प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती, गेल्या दोन वर्षांच्या कठीण काळात अभिनेत्रीला तिचा पती शंतनू मोघेने खंबीरपणे साथ दिली होती. प्रियाची काळजी घेता यावी यासाठी शंतनू मध्यंतरी कलाविश्वापासून दूर होता. आता अभिनेता ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत शंतनू मोघे मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे. आपल्या बहिणीचं लग्न रायासारख्या गावगुंडाशी व्हावं अशी शंतनूची अजिबात इच्छा नसते. त्यामुळे आता तो रायाच्या प्रेमाची परीक्षा घेणार आहे.
शंतनू मोघे ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो, “मालिकेतील माझ्या या भूमिकेचं नाव सुद्धा शंतनूच आहे. ही भूमिका खरंच खूप छान आहे. मुळात या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा मी एक भाग आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा ही भूमिका डिझाईन करण्यात आली तेव्हा चॅनेलकडून आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसकडून मला फोन आला होता. त्यानंतर मग ही भूमिका नेमकी काय आहे याबद्दल मला सविस्तर माहिती देण्यात आली. मला ही भूमिका काहीशी वेगळी वाटली…मी लगेच तयार झालो.”
अभिनेता पुढे म्हणाला, “आतापर्यंत मी महाराजांची भूमिका केलीये, शहाजी महाराजांची भूमिका केलीये… या ऐतिहासिक भूमिकांनंतर मी थोड्या वेगळ्या भूमिकेकडे वळलो. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अतिशय गोड भूमिका मी साकारली होती. मग, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’मध्ये निगेटिव्ह भूमिका केली. आता या नव्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा झाली…तेव्हा मला सगळ्याच गोष्टी आवडल्या. त्यामुळे नकार देण्याचा काही संबंधच नव्हता.”
“फिल्मी प्रवासात माझी खूप मोठी क्रिटिक ( टिकाकार ) माझी आई आहे. कारण, एखादी भूमिका साकारल्यावर मी आईला नेहमी म्हणतो…यात जे चांगलं केलंय ते आधी सांग मग वाईट गोष्टी सांग. मी प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगेन की, तुम्ही जे काही पाहता त्यातल्या ३ गोष्टी चांगल्या सांगा, मग समोरच्या माणसाला ५ गोष्टी वाईट सांगा. यामुळे समोरचा माणूस चांगल्या पद्धतीने ऐकून घेतो.” असं शंतनू मोघेने सांगितलं.