Prabhakar More New Song :’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कोकणी माणसाची भूमिका साकारणारे आणि आपल्या अचूक टायमिंगने हसवणारे अभिनेते म्हणजे प्रभाकर मोरे. या विनोदी कार्यक्रमात ते विनोदी स्किट्स सादर करतात. त्यांच्या प्रत्येक स्किट्समध्ये कोकणी भाषा ऐकायला मिळते.
तसेच या शोमध्ये प्रभाकर मोरे काही विनोदी स्किट्समधून ‘अगं शालू झोका देगो मैना…’ हे गाणंही सादर करतात. त्यांचं हे गाणं फारच लोकप्रिय झालं आहे. या कार्यक्रमात ते या गाण्याच्या लोकप्रिय ओळीच सादर करतात आणि त्यावर कोकणी शैलीतला डान्सही करतात. त्यांचं हे गाणं कुठेही वाजलं तरी प्रत्येकालाच या गाण्यावर ठेका धरावासा वाटतो.
अशातच आता प्रभाकर मोरेंच्या चाहत्यासाठी ‘शालू झोका देगो मैना’ हे गाणं भेटीला आलं आहे. त्यांच्या आगामी गाण्यातून प्रेक्षकांना हे गाणं पाहता येणार आहे. इतकंच नव्हे तर या गाण्यात स्वतः प्रभाकर मोरेही असणार आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ या आगामी सिनेमात ‘शालू झोका देगो मैना’ हे गाणं पाहता येणार आहे. नुकतीच या संपूर्ण गाण्याची झलक शेअर करण्यात आली आहे. या गाण्यात त्यांवच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगांवकरही आहे.
या गाण्याच्या सुरुवातीला प्रभाकर मोरे अमिताभ बच्चन स्टाईलमध्ये येतात. त्यानंतर कोळी स्टाईलमध्येही ते या गाण्यात थिरकताना दिसत आहे. तर पुढे या गाण्यात कोकणातील शिमगा या पारंपरिक सणाची सुद्धा छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. प्रभाकर मोरेंच्या या गाण्याला अवघ्या काही क्षणांतच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘शालू झोका देगो मैना’ या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, या गाण्याचे गायन लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी केलं आहे, गाण्याला संगीत किशोर मोहिते यांनी दिलं आहे. तर गाण्याचं गीतलेखन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील श्रमेश बेटकरने केलं आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे.