Samir Choughule on Nirmiti Sawant: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातील अनेक कलाकार सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. विविध संकल्पना आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या त्यांच्या कलेमुळे या कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रेम मिळते. अभिनेते समीर चौघुले हे त्यापैकीच एक आहेत.
“खऱ्या अर्थाने मी लेखन क्षेत्रात…”
सोनी मराठीवरील ‘एमएचजे अनप्लग्ड’ या पॉडकास्टमध्ये समीर चौघुले यांनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांना विचारले की, अभिनय करता-करता समीर चौघुलेंच्या आयुष्यात लेखन कधी आलं? यावर समीर चौघुले म्हणाले, “चंद्रकांत कुलकर्णींची टिकल ती पॉलिटिकल ही सीरिज होती, तिकडे मी लिहिलं. मग आवड लागली.”
“खऱ्या अर्थाने मी लेखन क्षेत्रात उतरलो ते दोन जणांमुळे उतरलो. एक म्हणजे निर्मिती सावंत आणि दुसरे म्हणजे राजेश देशपांडे यांच्यामुळे मी लेखन क्षेत्रात काम करू लागलो. त्यांची एका वाहिनीवर एक मालिका सुरू होणार होती. त्याचवेळी माझी दुसऱ्या वाहिनीवर मालिका सुरू होती. तर त्यांनी मला विचारले की तू लिहित का नाहीस? मी त्यांना सांगितलं की मला जमणार नाही. त्यावेळी मी अंग झटकलं होतं.”
“शेवटी निर्मिती दीदीची दहशत सगळ्यांना माहीत आहे. त्या मला म्हणाल्या की मला माहीत नाही, तू लिहिलं पाहिजेस, नाहीतर माझ्याशी बोलू नकोस. त्यांनी तसं म्हटल्यानंतर मी एपिसोड लिहिले. त्यांना ते खूपच आवडले. त्यानंतर मलाही लेखणाची गोडी लागली, मग महाराष्ट्राची हास्यजत्रासारख्या अनेक मालिका आल्या.”
समीर चौघुलेंना विचारले की, त्या लेखनाने तुझ्या करिअरला आणि खासगी आयुष्यालासुद्धा साथ दिली का? त्यावर ते म्हणाले, “मी कार्टून फिल्मदेखील लिहिल्या आहेत. मी ऑगी अँड कॉकरोचेस, शिनचॅन, कोबोचॅन लिहायचो. मध्यंतरीच्या काळात मी डिस्कव्हरी चॅनेलसाठीदेखील लिहायचो; तर हे सगळं करत करत गोडी लागली. मग मी ठरवलं की मी फार निवडक लिहीन. मला ज्याचा आनंद मिळतो, तेवढंच लिहीन.”
समीर चौघुले यांनी चित्रपट, मालिका आणि महाराष्ट्राची हास्यजत्रासारख्या विनोदी कार्यक्रमात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी लेखक म्हणूनदेखील काम केले आहे.
दरम्यान, समीर चौघुले यांची प्रमुख भूमिका असलेला गुलकंद हा चित्रपटदेखील मोठ्या प्रमाणात गाजला. यामध्ये प्रसाद ओक, सई ताम्हणकर हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांत दिसले होते. आता आगामी काळात ते पुन्हा कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.