Maharashtrachi Hasyajatra Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. या विनोदी कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. याच शोमुळे अभिनेत्री वनिता खरात सर्वत्र नावारुपाला आली. वनिताने रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यानंतर मराठी मालिका व सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. एवढंच नव्हे तर वनिता शाहीद कपूरच्या ब्लॉकबस्टर ‘कबीर सिंग’ सिनेमात देखील झळकली होती.
वनिताचा ‘कबीर सिंग’ मधला भन्नाट सीन सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला होता. या भूमिकेसाठी तिला दिग्गजांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या वनिता खरातने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.
वनिताने यंदा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा केला आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने स्वत: तिच्या वयाबद्दल खुलासा केला आहे. याशिवाय यंदाचा वाढदिवस वनिताने प्रेक्षकांबरोबर सेलिब्रेट केला. वाढदिवसाच्या दिवशीच तिच्या ‘ठरता ठरता ठरेना’ या नाटकाचा प्रयोग देखील होता. याशिवाय इतरही कार्यक्रम होते. प्रयोग पार पडल्यावर प्रेक्षकांसमोर केक कापून अभिनेत्रीने वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.
वनिता खरात भावना व्यक्त करत लिहिते…
३१ वा वाढदिवस-रंगमंचावर गेला!
१९ जुलै २०२५आजचा दिवस खास होता कारण तो कामात गेला, माझ्या स्वप्नांसह गेला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे- तो प्रेक्षकांच्या प्रेमात गेला…
मी कलाकार आहे – रंग, प्रकाश, शब्द, हालचाली यांच्यात मी माझं आयुष्य वाहिलं आहे. वाढदिवस असो की कोणताही दिवस, माझ्यासाठी खरी भेट म्हणजे प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांचा आवाज, त्यांच्या डोळ्यातलं समाधान आणि मनातून आलेली दाद.
हेच प्रेम मिळालं आज.
त्यामुळे वाटतं – प्रत्येक दिवस हा एक नवा वाढदिवसच असावा!
जिथे काम असावं, कला असावी, आणि तुमचं असं भरभरून प्रेम असावं!या प्रवासात साथ देणारा माझा मित्र परिवार, कुटुंब, रसिक प्रेक्षक यांचे मनापासून आभार.
माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे…..
३१ पूर्ण – आणि प्रवास अजून सुंदर होणार आहे…
दरम्यान, वनिताच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव करत तिला पुढील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘येरे येरे पैसा ३’मध्ये झळकली आहे. ‘गुलकंद’, ‘एकदा येऊन तर बघा’, ‘चिकी चिकी बुबूम बूम’ अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलेलं आहे.