गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर काही कलाकार जोडप्यांनी एकमेकांपासून विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत. काही हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय मराठी जोडप्यांमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच एका हिंदी कलाकार जोडीचं नाव आहे आणि ही जोडी म्हणजे अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज.
काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांनी माही आणि जय यांच्या घटस्फोटाबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यावर आता स्वत: माहीनं व्हिडीओ शेअर करीत सत्य सांगितलं आहे. काही माध्यमांनी असा दावा केलाय की, या जोडीने जुलै-ऑगस्टमध्ये घटस्फोटाची कागदपत्रे साइन केली आहेत आणि माही पाच कोटी रुपयांची पोटगी मागत आहे.
या सगळ्या अफवा आणि चर्चांवर आता माहीनं आपल्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओद्वारे मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली, “मला या विषयावर बोलायचंदेखील नव्हतं; पण आणखी अफवा व चर्चा होऊ नयेत म्हणून बोलायला लागतंय. कारण- मला माहीत आहे की, लोक फक्त कमेंट्स आणि लाइक्ससाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी कुठेतरी वाचलंय की, मी घटस्फोटाची कागदपत्रं साइन केलीत. मग ती कागदपत्रं मला दाखवा. दुसरं म्हणजे जोपर्यंत आम्ही काही बोलत नाही, तोपर्यंत आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल टिपण्णी करण्याचा कुणालाच अधिकार नाही.”
पुढे माही म्हणते, “आम्ही सेलिब्रिटी आहोत. पण, मी फक्त तितकंच सांगेन, जितकं मी सांगू इच्छिते. माझ्यावर आई आणि माझ्या मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत.” व्हिडीओमध्ये माहीने तिची मुलगी खुशीचा मेसेजदेखील दाखवला. खुशीने माहीला घटस्फोटाची अफवा असलेली पोस्ट पाठवली आणि विचारले, “हे काय बकवास आहे?” त्यावरूनच माहीने तिच्या घटस्फोटाच्या अफवा आणि चर्चांचा तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि मुलांच्या मनावर खोल परिणाम होत असल्याचे सांगितले.
अभिनेत्री माही विज इन्स्टाग्राम पोस्ट
या व्हिडीओद्वारे माहीने स्पष्टपणे तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितले. व्हिडीओमध्ये ती जयबद्दल प्रेमाने बोलली. मात्र, व्हिडीओमध्ये तिने त्याला पती म्हणून संबोधले नसल्याचे चाहत्यांना पटकन लक्षात आले. दरम्यान, माहीने स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा मोकळेपणाने तिचे मत व्यक्त केले आहे.
माहीने पोटगीबद्दलही आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली, “जेव्हा मार्ग वेगळे होतात, तेव्हा प्रत्येकानं स्वतः कमावलं पाहिजे आणि जेव्हा जोडीदार सोबत असतो, तेव्हादेखील प्रत्येक मुलीनं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहावं आणि फक्त वडील किंवा पतीवर अवलंबून राहू नये. पोटगीबाबत बोलायचं झालं, तर जोपर्यंत तुम्ही माझ्याकडून ऐकत नाही, तोपर्यंत कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माहीनं तिच्या आणि जयच्या नात्याविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. तिनं एका व्हायरल पोस्टखाली कमेंट करीत “उगाच खोट्या बातम्या पोस्ट करू नका. मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे”, असे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा तिने व्हिडीओद्वारे अफवा पसरवणाऱ्यांचे कान टोचले आहेत.
