Actress Manava Naik : ‘आभाळमाया’, ‘तुझं माझं जमेना’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री मनवा नाईक घराघरांत पोहोचली. सध्या मराठी मालिकाविश्वातील आघाडीची निर्माती म्हणून देखील ओळखलं जातं. मनवाने काही महिन्यांपूर्वीच नवीन गाडी खरेदी होती. मात्र, तिची गाडी नवीन असूनही काही दिवसांतच बिघडली. यासंदर्भात अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गाडीत वारंवार बिघाड होत असल्याने प्रचंड गैरसोय झाल्याचं मनवाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
मनावाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा संपूर्ण अनुभव सांगितला आहे. तसेच या व्हिडीओला “माझा भयानक अनुभव” असं कॅप्शन मनवाने दिलं आहे.
मनवा म्हणते, “मला आलेला एक भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे टाटा नेक्सन EV गाडी आहे. आता गाडी आहे म्हणू की होती म्हणू? खरंच कळत नाहीये कारण, गेल्या सहा महिन्यांपासून ती टाटाच्या वर्कशॉपमध्ये जाऊन-येऊन असते. दरवेळी चार-पाच दिवस झाले की ती गाडी बंद पडते. कधी गिअर अडकतो, कधी बॅटरी संपते आणि ही नवीन गाडी आहे.”
“मी टाटा मोटर्स, नेक्सन, ज्यांच्याकडून मी गाडी होती ते…या सगळ्यांना ई-मेल केले आहेत. पण, अजूनही परिस्थिती बदलली नाहीये. सहा महिन्यांत सहा वेळा गाडी बंद पडलीये. गिअर अडकतो, रस्त्यात मध्येच बंद पडते… यामुळे गाडी चालवताना भीती वाटते, काळजी वाटते. त्यामुळे गाडी खरेदी करताना तुम्ही सुद्धा काळजी घ्या…” असा सल्ला अभिनेत्रीने चाहत्यांना दिला आहे.
नेटकऱ्यांनी मनवाच्या व्हिडीओवर कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ताई तुला जो मनस्ताप झाला तो इतरांना होऊ नये किंवा त्यांनी सतर्क राहावे यासाठी तू व्हिडिओ केलास यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.”, “सेलिब्रिटींची अशी अवस्था असेल तर सामान्य लोकांनी काय करावं ?” अशा प्रतिक्रिया युजर्सनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.
दरम्यान, मनवा नाईकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, ‘स्टार प्रवाह’च्या नुकत्याच ऑफ एअर झालेल्या ‘आई आणि बाब रिटायर होत आहेत’ या मालिकेची ती निर्माती होती. याशिवाय ‘बॉस माझी लाडाची’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांचीही तिने निर्मिती केली होती.