Why Adish Vaidya Exit From Star Pravah’s Aai Ani Baba Retire Hot Aahet Serial : स्टार प्रवाहच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य मकरंद किल्लेदार ही भूमिका साकारत होता. मात्र, मालिका सुरू असताना त्याने अर्ध्यावरच एक्झिट घेतली होती. यानंतर मकरंदच्या भूमिकेसाठी ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेता अमित रेखीची वर्णी लागली होती. मात्र, आदिशचे चाहते त्याला या मालिकेत मिस करत होते. मालिका सोडल्यावर त्याने ‘स्वाभिमान सगळ्यात महत्त्वाचा’ अशा आशयाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.
आदिशने शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याचं मालिका सोडण्याचं नेमकं कारण काय आहे याबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. अखेर ‘सकाळ प्रीमियर’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.
आदिश म्हणाला, “एका अभिनेत्याचं आयुष्य अजिबात सोपं नसतं. एक नट म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी हँडल कराव्या लागतात. खरं सांगायचं झालं तर, एका मालिकेतून माघार घेणं हे माझ्यासाठी किंवा कोणत्याच अभिनेत्यासाठी सोपं असूच शकत नाही. पण, मला हा निर्णय घ्यावा लागला. कारण, माझ्या १० वर्षांच्या करिअरमध्ये मुळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात अशी घटना घडली होती की मी म्हणेन, असं कधीच कोणाबरोबर घडू नये. मी एक हिंदी आणि एक मराठी असे दोन शो एकत्र करत होतो. माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. पण, याआधी एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून मी अशी परिस्थिती कधीच फेस नव्हती केली. ऑनसेट आरडाओरडा, शिवीगाळ, सतत तुम्हाला बोललं जात असेल तर अशावेळी सगळ्या गोष्टी आपल्या स्वाभिमानावर येतात.”
आदिश पुढे म्हणाला, “मी दुसऱ्यांचा नेहमी आदर करतो पण, याचबरोबर मी माझा स्वाभिमानही जपतो. मी दोन शो करत असल्याने मला कधी या सेटवरून तिकडे, कधी इकडे असं जावं लागायचं. अर्थात त्याच अटींवर मला शोमध्ये घेतलं होतं. सकाळी ७ पासून ते रात्री १२ वाजेपर्यंत मी दोन्ही शोसाठी शूट करायचो. त्यामुळे माझ्यासाठी सोपं काहीच नव्हतं. पण, या सगळ्या गोष्टींमुळे प्रोडक्शनमधल्या एका माणसाशी इगो क्लॅशेश झाले. त्याचं म्हणणं होतं…तुझ्या तारखा मॅनेज करणं वगैरे मला जमणार नाही. पण, माझं असं झालं की, याच अटींवर तुम्ही मला घेतलं आहे मग, मला तेवढा वेळ द्या. बरं मी दोन्ही सेटवर वेळेत पोहोचत होतो…सगळं मॅनेज करत होतो.”
“मला सांगण्यात आलं की… मी सांगेपर्यंत सेट सोडून जायचं नाही. गेलास तर बघ वगैरे…तेव्हा माझे वडील रुग्णालयात अॅडमिट होते. लीलावतीमध्ये त्यांचे उपचार सुरू होते…अजूनही त्यांची ट्रिटमेंट सुरू आहे. अर्थात तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता आणि मला ३ तासांसाठी रुग्णालयात जाणं गरजेचं होतं. मी एक दिवस आधीच त्या माणसाला या सगळ्याची कल्पना दिली होती. बरं यानंतर वेळेपेक्षा अधिक काम करण्यास सुद्धा मी तयार होतो. माझी ही गरज त्याला एक संधी वाटली असेल…ती व्यक्ती सेटवर आली, माझा शॉट थांबवला. अख्ख्या सेटवर आरडाओरडा झाला. अंगावर धावत येऊन अगदी समोर येऊन उभा राहिला…हे सगळं काही माझ्याबरोबर घडलंय. पहिल्यांदा हे सगळं कामाच्या ठिकाणी घडलं होतं त्यामुळे खूप मोठा धक्का बसला. अंगावर धावून येणं हे कुठे घडतं? मी त्यावेळी मालिका सोडली कारण, माझ्यासाठी, माझ्याबाजूने कुणीच उभं राहिलं नाही.” असं आदिश वैद्यने सांगितलं.