मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या अनेक नवनवीन चेहरे मुख्य कलाकारांच्या भूमिकेत विविध मालिकांमध्ये झळकत आहेत. मात्र, अनेकदा काही मालिकांमधल्या कलाकारांची मराठी भाषा शुद्ध नाही, त्यांना मराठी व्यवस्थित बोलताच येत नाही तर, काही कलाकारांना अभिनयच येत नाही अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर दिल्या जातात.
एखादी गोष्ट आवडल्यास प्रेक्षक जसे कौतुक करतात, अगदी त्याचप्रमाणे एखादी गोष्ट खटकल्यास अलीकडच्या काळात त्यावर सोशल मीडियावर उघडपणे चर्चा केली जाते. काही मालिकांना अतिरंजक ट्विस्टमुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं…अशा अनेक गोष्टी टेलिव्हिजन विश्वात घडत असतात.
सध्या टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे रोहन पेडणेकर. तो ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. रोहनने काही मालिकांचं लेखन सुद्धा केलं आहे. त्याने नुकतीच शेअर केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे टेलिव्हिजन विश्वातील सध्याची स्थिती या अभिनेत्याने अधोरेखित केली आहे. रोहन नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात…
रोहन पेडणेकरची पोस्ट
हल्लीच एका मालिकेची मुख्य अभिनेता म्हणून स्टोरी केली…
त्या कथेसाठी मुख्य पात्र ५ ते ६… त्यातील काही कलाकार खरंच धन्यवाद होते… खरंतर न राहवून ही पोस्ट लिहितोय… कारण खूप त्रास होतोय… गेली १५ – २० वर्षे थिएटर – मालिका या क्षेत्रात वावरतोय… पण सध्या चित्र भयानक दिसतंय… कारण, काम करणारे काही कलाकार हे या क्षेत्राला हलक्यात घेतायत.. हे काय मी असं करेन… मला सहज जमेल… व्यक्तिरेखेचा अभ्यास नाही… स्क्रिप्टचं वाचन नाही… साधं शुद्ध मराठी बोलता येत नाही… शुद्ध मराठी जाऊदे त्या-त्या पात्रांची भाषाही बोलता येत नाही…एका महाभागाचं वाक्य होतं… “मी त्याच मुलीशी लग्न करणार” हा महाशय म्हणतोय “मी त्याच मुलगीशी लग्न करणार” अनेक टेक झाले, दिग्दर्शक समजावून दमले… कसा बसा फायनल टेक घेतला… त्यानंतर हा नट मला विचारतोय… मुलगी हा शब्दच नसतो का…
मी डोक्यावर हात मारला… आणि म्हणालो… मित्रा तुला प्रचंड वाचायचं आहे… वाचशील तर वाचशील…
व्याकरण, भाषा, वाक्यप्रचार, वाक्यरचना यांचा काहीही अभ्यास नसलेली… स्वतःला अभिनेता – अभिनेत्री म्हणून मिरवणारी ही पिल्लावळ वाढत चाललीय… माझी या क्षेत्रात महत्त्वाच्या पदी असणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे… खूप खूप चांगले कलाकार हल्ली घरी बसून आहेत… ज्यांनी अनेक वर्षे थिएटर ( एकांकिका – नाटक ) करून यात यश संपादन केलंय आणि आजच्या घडीला अविरत काम करत आहेत… कृपया अशा गरजूंना संधी द्या… बऱ्याच ठिकाणी असा वाईट अनुभव येतोय… काही ठिकाणी खरंच खऱ्या कलाकारांची दखल – कदर केली जाते, पण काही ठिकाणी अभिनेता असलेल्याचा अभिनय करणाऱ्या कलाकारांना उगाचच डोक्यावर बसवलं जातंय… अशाने खरे कलाकार संपले जातायत… संपवले जातायत… मारले जातायत…
दरम्यान, रोहनच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप महत्त्वाचं बोलला आहेस मित्रा…कमी पैशांत कलाकार घ्यायचे आणि सेटवर टाईमपास करायचा हेच सुरू आहे”, “अगदी बरोबर आणि खरी पोस्ट आहे ही…आज चांगले चांगले कलाकार घरी बसलेले आहेत”, “Co ordinator हटवा मराठी इंडस्ट्री वाचवा”, ‘रील्समुळे अभिनयाची व्याख्याच बदलली आहे” अशा प्रतिक्रिया रोहनच्या पोस्टवर प्रेक्षकांनी दिल्या आहेत.