अलीकडच्या काळात ऑनलाइन स्कॅम, फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सोशल मीडिया लिंक्स, बनावट कॉल यामार्फत फसवणूक करून नागरिकांकडून पैसे उकळले जातात. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार सुद्धा ऑनलाइन स्कॅमचे बळी पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर कारंडेला सुद्धा असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे. त्याची तब्बल ६१.८३ लाखांना फसवणूक झाली आहे. सागर कारंडेची फसवणूक नेमकी कशी झाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडेला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेज आला. या महिलेने सागरला इन्स्टाग्राम लिंक पाठवली आणि प्रत्येक लाइकसाठी १५० रुपये मिळतील असं सांगितलं. घरबसल्या पैसे कमावण्यात येतील असा दावा करण्यात आला होता. अभिनेत्याने हे काम करण्यास सहमती दर्शवली आणि संबंधित इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करण्यास सुरुवात केली.

सागर कारंडेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला सुरुवातीला ११ हजार या स्कॅमर्सनी दिले आणि यामुळे अभिनेत्याने हे काम असंच चालू ठेवलं. सागरच्या विश्वासाचा पुढे गैरफायदा घेण्यात आला. सायबर गुन्हेगारांनी त्याला अधिक कमाईसाठी यात गुंतवणूक करण्यास भाग पाडलं.

सागर कारंडेने सुरुवातीला २७ लाख रुपये भरले आणि पुढचं काम स्वीकारलं. यानंतर अभिनेत्याने वॉलेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण, टास्क पूर्ण झाल्यावर पैसे मिळतील असं सांगण्यात आलं. यानंतर ८० टक्के काम झालेले आहे आणि पैसे परत घेण्यासाठी शंभर टक्के रक्कम भरावी लागेल असं सांगण्यात आलं. त्यानुसार अभिनेत्याने आणखी १९ लाख आणि त्यावर ३० टक्के कर भरला. अशारितीने सागरकडून एकूण ६१.३० लाख उकळण्यात आले.

अभिनेत्याला एवढी मोठी रक्कम भरल्यावर एकही रुपया परत मिळाला नाही. याउलट भरलेला कर चुकीच्या खात्यात गेलाय असं सांगून आणखी पैशांची मागणी केली जात होती. यानंतर सागरला संशय आला आणि त्याने तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, सागर कारंडेची फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ( उत्तर विभाग ) ३ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sagar karande cheated by cyber scammers by 61 lakhs sva 00