Sankarshan Karhade Helps To Marathwada Flood People : सध्या मराठवाडा भागात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये घरं, शेतजमीन आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे खूपच हाल झाले आहेत.
या पुरामुळे मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांतील लोकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे राज्य शासन आणि काही संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अनेक मराठी कलाकारसुद्धा मदतीसाठी पुढे आले आहेत. सुबोध भावे, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, ऋतुराज फडके, सौरभ चौघुले यांसह अनेक कलाकारांनी मदत जाहीर केली आहे.
अशातच आता संकर्षण कऱ्हाडेने मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून, त्याने या व्हिडीओमधून चाहत्यांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे. संकर्षणनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत तो म्हणतो, “हा व्हिडीओ मी अत्यंत काळजीपूर्वक, जबाबदारी व तळमळीने करीत आहे. काही दिवसांपासून बातम्यांमधून मराठवाडामधील पूर परिस्थिती पाहत आहे. उभ्या राहिलेल्या पिकांमध्ये कंबरेइतकं पाणी शिरलं आहे., सोयाबीन, कापूससह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. हे फार फार क्लेशदायक आहे.”
पुढे संकर्षण म्हणतो, “मी सध्या मुंबईत आहे, तिथे येऊन मदत करू शकत नाही. त्यामुळे मी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ एक नंबर दिला. माझ्याकडून मी माझ्या परभणी, मराठवाड्यासाठी फूल न फुलाची पाकळी म्हणून मदत जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा व्हिडीओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, मग तो या क्षेत्रातील असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातला… जगभरातील ज्या मराठी माणसाला मदत करता येईल, त्यानं जरूर मदत करावी ही विनंती.”
संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम पोस्ट
या व्हिडीओसह संकर्षण कॅप्शनमध्ये म्हणतो, “थोडा संयम ठेवा… पुढच्या वर्षी हेच पाणी साथ देईल, त्रास देणार नाही…” संकर्षणने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच अनेकांनी संकर्षणच्या या कृतीचं कौतुकही केलं आहे.
दरम्यान, अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करीत आर्थिक आणि वस्तुरूपातील मदतीसाठी आवाहन केलं आहे. काही कलाकारांनी थेट पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन अन्न, पाणी, कपडे आणि गरजेच्या वस्तूचे वाटप केले आहे. काही कलाकारांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली आहे.