Shashank Ketkar Shares Video For Wife: अभिनेता शशांक केतकर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

‘मुरांबा’ मालिकेत शशांक केतकरने अक्षय मुकादम ही भूमिका साकारली आहे. त्याच्याबरोबर या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रुमख भूमिकेत दिसत आहे. रमा व अक्षय या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसते. आता मात्र अभिनेता त्याच्या मालिकेमुळे नाही तर त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

शशांक केतकर म्हणाला…

शशांकने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसाठी मातृदिनानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या पत्नीचे काही सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत. ती गरोदर होती तेव्हाचे काही फोटो पाहायला मिळत आहेत, तर काही शशांक व प्रियांका यांचे खास फोटो आहेत. काही फोटो त्यांच्या मुलांबरोबरचे आहेत.

या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो की, एक अतिशय सुंदर स्त्री, माझी मैत्रीण, त्यानंतर माझी प्रेयसी आणि त्यानंतर माझी बायको. आता ऋग्वेद, राधा आणि माझीसुद्धा आई. खरंच, प्रियांका तुझ्यामुळे माझ्यातल्या पुरुषाला, माझ्यातल्या बापाला आईपण जपता येतं. हॅपी मदर्स डे प्रियांका”, असे म्हणत अभिनेत्याने पत्नीला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शशांक केतकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याच्या पत्नीने कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. प्रियांका केतकरने या व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले, “तू तर रडवलंस”, याबरोबरच अनेक चाहत्यांनी शशांकचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

“खरंच खूप सुंदर अर्थपूर्ण व्हिडिओ”, “किती सुंदर विचार आहेत. आपुलकीचे आदराचे महत्त्वाचे विचार आहेत”, “शशांक केतकर सगळ्यात किमती तुम्ही तुमच्या बायकोला दागिना दिला. नवरा असावा तर असा”, “खूप सुंदर”, “तुमच्या कुटुंबाला खूप आशीर्वाद”, अशा कमेंट करीत चाहत्यांनी शशांकचे कौतुक केले आहे. तर अभिनेत्री रेश्मा शिंदेनेदेखील हार्ट इमोजी शेअर केली आहे. अभिनेत्याने आईसाठीदेखील व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, अभिनेता त्याच्या कामाबरोबरच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट तसेच त्याच्या वक्तव्यांमुळे मोठ्या चर्चेत असतो.