मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत विविध व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं. हे कलाकार अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही यशस्वी ठरले आहेत. काही सेलिब्रिटींनी स्वतःचं हॉटेल, तर काहींनी कपड्यांचे ब्रँड किंवा साड्यांचं दालन सुरू केलं आहे. प्राजक्ता माळी, प्रिया बापट, अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मधुरा जोशी, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर, हार्दिक जोशी, निरंजन कुलकर्णी यांसारखे अनेक कलाकार आपला व्यवसाय सांभाळून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.
आता मराठी मालिकाविश्वात काम करणाऱ्या लोकप्रिय दाम्पत्याने नुकतीच हॉटेल व्यवसायात एन्ट्री घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अबोली’ मालिकेतील पल्लवी म्हणजेच अभिनेत्री अनुजा चौधरी आणि तिचा पती अभिनेता संकेत मोडक यांनी पुण्यातील मुळशी येथे स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे.
अनुजा व संकेत यांचा विवाहसोहळा मे महिन्यात पार पडला होता. ‘फसक्लास दाभाडे’, ‘क्रिमिनल’, ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’, ‘यम है हम’ अशा नाटक, मालिका, चित्रपटासाठी संकेतने काम केलेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकेत आणि अनुजा यांनी त्यांच्या नव्या व्यवसायाचा शुभारंभ केला आहे.
अभिनेत्री पोस्ट शेअर करत लिहिते, “गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक नवीन सुरुवात… स्वामींचं नाव घेऊन आम्ही एक नवीन सुरुवात करत आहोत. कलाकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहोतच पण, याच बरोबरीने हॉटेल व्यवसायात सुद्धा काम करायची इच्छा होती. मुळशी रोड भुकुम येथे “पोटभर मिसळ घर” या नावाने आमचं स्वतःचं हॉटेल सुरु केलं आहे. तरी सर्वांनी नक्की या… आणि आम्ही स्वतः बनवलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्या. सरळ मार्गी चालत राहण्याचा एकच फायदा असतो तो म्हणजे देव नेहमी योग्यच दिशा दाखवतो. स्वामी कृपा झाली. श्री स्वामी समर्थ!”
दरम्यान, अनुजा व संकेत यांच्या नव्या हॉटेलचं नाव ‘पोटभर मिसळ घर’ असं आहे. सध्या नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकार या जोडप्याला नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देत आहेत.