प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलच्या दुकानावर काही दिवसांपूर्वीच अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. कोणतीही नोटीस न देता दुकानावर कारवाई करण्यात आल्याचा दावा हिंदवीने माध्यमांसमोर केला आहे. या कारवाईनंतर हिंदवीने नाराजी व्यक्त केली असून तिला अश्रू अनावर झाल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या कारवाईमध्ये दुकानाच्या नावाचा बोर्ड आणि सीसीटीव्हीचं मोठं नुकसान झालं असल्याचं देखील हिंदवीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. या घटनेवर आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सोळंकीने प्रतिक्रिया दिली आहे.
छोट्या पडद्यावरच्या विनोदी कार्यक्रमांमधून अभिनेत्री आरती सोळंकी घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय ती ‘बिग बॉस मराठी’मध्ये देखील झळकली आहे. आरती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सामाजिक तसेच मनोरंजन विश्वातील घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरती नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते. हिंदवी पाटीलबद्दल अभिनेत्री नेमकं काय म्हणालीये जाणून घेऊयात…
आरतीची पोस्ट…
कुठे गेले ते मिलियन फॉलोअर्स आणि नेतेमंडळी जे यांचे शोज ठेवतात. बाई नाचताना बघायला आवडते पण, कष्ट करून पोट भरताना नाही. माझ्यासारखे लोक या मुलींना नावं ठेवतात की, यांच्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झालाय. सत्य हे आहे की त्यांना नाचवणाऱ्यांनी बिहार केलाय. मी या मुलीची बाजू घेत नाहीये…पण, कुठल्याही स्त्रीला अशाप्रकारे नाच करायला आवडणार नाही. ती फक्त पोट भरण्यासाठी, स्वत:चं घर चालवण्यासाठी हे करतेय. आज या हिंदवी पाटीलच्या शोवर बंदी नाहीये पण, तिच्या दुकानावर कारवाई केली जातेय. खरंतर, जे लोक यांचे शोज ठेवतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गरीबाने कष्ट करू नये, फालतूगिरी केली तर चालेल आज जर ती कष्ट करून पोट भरू पाहतेय तर तिला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे.
दरम्यान, आरती सोळंकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे. तिचं “शिट्टी वाजली…” हे गाणं सर्वत्र तुफान व्हायरल झालं होतं. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजवलं जातं. याशिवाय ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतही ती झळकली होती.