Marathi Actress Childhood Photo : आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. मराठी मालिका विश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीला इंडस्ट्रीमध्ये १० वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने या अभिनेत्रीने खास जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास ‘अस्मिता’ या लोकप्रिय मालिकेतून सुरू केला होता आणि आज तिच बालकलाकार ‘झी मराठी’च्या सध्या सुरू असलेल्या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसतेय. ती कोण आहे जाणून घेऊयात…

‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘कमळी’ मालिकेने प्रेक्षकांची अल्पावधीतच पसंती मिळवली आहे. यामध्ये अभिनेत्री केतकी कुलकर्णी अनिका ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी केतकीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. नुकतीच केतकीला या इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण झाली. दहा वर्षांपूर्वी ‘झी मराठी’च्या अस्मिता या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

झी मराठीवरील ‘अस्मिता’ या गाजलेल्या मालिकेत केतकी कुलकर्णी झळकली होती. तिने यामध्ये पूजा ही भूमिका साकारली होती. केतकी म्हणते, “मी तीन वर्षांची असल्यापासून स्वतःला टीव्हीवर पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि झी मराठीमुळे हे स्वप्न पूर्ण झालं. तेव्हापासून आजवर, मी सुमारे १२ महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं. लहानपणापासून झी मराठीवरील कार्यक्रम मी पाहत होते आणि आज त्या परिवाराचा भाग आहे, ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे. या १० वर्षांत, मी अनेक चढ-उतार अनुभवले. संघर्ष, नकार, संधींची प्रतीक्षा हे सगळं शिकताना मी कायम पाय जमिनीवर ठेवले. या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे. वाट पाहायची, देवावर विश्वास ठेवायचा, मेहनत करायची आणि मग यश नक्की मिळतं.”

केतकी कुलकर्णीचे अस्मिता व कमळी मालिकेतील लूकचे फोटो

दरम्यान, केतकी कुलकर्णी ही अवघ्या २० वर्षांची असून तिने काही हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तिने २० व्या वाढदिवसानिमित्त स्वत:साठी आलिशान गाडी घेतली होती. याचे फोटो देखील सर्वत्र व्हायरल झाले होते.