Mrunmayee Deshpande Wishes On Mothers Day: ११ मे २०२५ ला मातृदिन साजरा केला जात आहे. सर्व जण आईविषयी त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. यामध्ये कलाकारांचादेखील समावेश आहे. आता अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने मातृदिनाच्या निमित्ताने तिच्या भावना व्यक्त करत एक खास संदेश दिला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मृण्मयी देशपांडेचा आहे. मृण्मयी म्हणते, “कधी कुठे दुखापत झाली तर पहिल्यांदा तोंडातून आई गं हे शब्द बाहेर पडतात. अडचणीच्या काळात, आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा तिची आठवण येते. जी व्यक्ती आपल्या यशात, सुख-दु:खात प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर असावं असं वाटतं, ती व्यक्ती म्हणजे आपली आई असते.”
तसंच मुलांनासुद्धा आपल्या आईचं वय वाढतंय…
पुढे अभिनेत्री म्हणाली, “आईला आपली मुलं मोठी होतात असं कधीच वाटत नाही. तसंच मुलांनासुद्धा आपल्या आईचं वय वाढतंय, यावर कधी विश्वास बसत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपण तिला गृहीत धरत असतो. मला असं वाटतं की गृहीत धरणं, हे जे नातं आहे किंवा इतका प्रचंड हक्क आपण ज्या व्यक्तीवर दाखवू शकतो, ती आई असते.”
आईसुद्धा म्हातारी होते हेदेखील डोक्यात ठेऊयात. आपल्यासाठी नाही तर आईसाठी काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवूयात, असे म्हणत अभिनेत्रीने मातृदिनाच्या निमित्ताने खास संदेश दिला आहे.
मृण्मयी देशपांडेबरोबरच अनेक कलाकारांनी मातृदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अमित भानुशाली, जुई गडकरी, ईशा केसरकर, हेमल इंगळे, मधुराणी प्रभुलकर, नम्रता संभेराव अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
मृण्मयी देशपांडेबाबत बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह अभिनेता गश्मीर महाजनी व सुरभी भोसले प्रमुख भूमिकेत दिसले होते. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यांसारख्या मालिका आणि ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘चंद्रमुखी’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’, यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. याबरोबरच ती रिअॅलिटी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील करताना दिसते.
दरम्यान, अभिनेत्री अभिनयाबरोबरच शेती करतानादेखील दिसते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील शेतीबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.