Marathi Actress Prajakta Parab : मराठी मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी यंदा गौरी-गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सगळ्या सेलिब्रिटींनी काही दिवस शूटिंगमधून ब्रेक घेऊन गणरायची मनोभावे सेवा केल्याचं पाहायला मिळालं. काही कलाकार बाप्पाचं स्वागत करण्यासाठी कोकणात गावी पोहोचले होते. तर, काही सेलिब्रिटींच्या मुंबईच्या घरीच बाप्पाचं आगमन झालं होतं. गणेशोत्सवात पूजा, आरती, बाप्पाचा नैवेद्य या सगळ्या गोष्टी विशेष लक्ष देऊन कराव्या लागतात. लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने बाप्पासाठी बनवलेल्या नैवेद्याची झलक सर्वांना दाखवली आहे.
‘मन उडू उडू झालं’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता परब. गणेशोत्सवात अभिनेत्रीने अगदी मनोभावे बाप्पाची सेवा केल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताने गणपती बाप्पासाठी स्वत: नैवेद्य बनवला होता. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये सुरुवातीला खोबरं किसत असल्याचं पाहायला मिळत आहे. या ओल्या खोबऱ्यापासून तिने उकडीचे मोदक बनवले होते. यानंतर प्राजक्ताने ऋषीची भाजी बनवली, शिवाय गरम मसाल्याचं वाटण काढून गरमागरम उसळ बनवली. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने अळुवड्या बनवल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यानंतर अभिनेत्रीने हा नैवेद्य बाप्पाला दाखवला.
प्राजक्ताने या व्हिडीओला ‘परबांचा चेडू’ असं मालवणी कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री असूनही प्राजक्ताने जपलेला साधेपणा आणि तिच्या पाककौशल्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “सुगरण आहेस गं”, “एक नंबर ताई”, “परबांचा चेडू भारीच आसा”, “खूप खूप गोड दिसतेस…आणि कमाल रेसिपी”, “सर्वगुण संपन्न आमची प्राजक्ता”, “परबांचा चेडू अळूवडी बनवता…” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, प्राजक्ता गेल्या काही महिन्यांपासून ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत झळकत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे तिच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “तुम्ही सिरियल का सोडली” असा प्रश्न विचारला आहे, यावर अभिनेत्रीने, “मालिका सोडली नाहीये लवकरच परत येईन” असं उत्तर दिलं आहे.