महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रसिद्घीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदलकरला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. प्रियदर्शनीने ‘ई टीव्ही मराठी’ या वाहिनीवरील ‘अफलातून लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र नुकतंच तिने तिच्या आयुष्यातील एक स्वप्न अपूर्ण राहिल्याबद्दलची खंत व्यक्त केली.
प्रियदर्शनी लवकरच ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यानिमित्ताने तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियदर्शनीने मला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) मध्ये प्रवेश घ्यायचा होता, असा खुलासा केला. यावेळी तिने तिची ही संधी का हुकली याबद्दलही सांगितले.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
“२०१० मध्ये अफलातून नावाचा एक स्टँडअप कॉमेडी शो आला होता. त्याच कार्यक्रमातील एक छोटा व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मी आईबरोबर पुण्याहून मुंबईला शूटींगसाठी यायचे. त्या शोमुळे मला अभिनय क्षेत्र आवडू लागले. अफलातूननंतर मला बालकलाकार म्हणून काही कामांसाठी विचारण्यात आलं होतं. पण दहावीचं वर्ष असल्याने त्यावेळी काही करता आलं नाही.
अकरावी-बारावीदेखील अभ्यास करण्यात गेली. मला दिल्लीला एनएसडीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी जायचं होतं. पण इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्याने ते रखडलं. पण इंजिनिअरिंगबरोबरच मी नाटकही करणार, असं मी आई-बाबांना सांगितलं होतं.दहावीनंतर एनएसडीमध्ये जाण्यासाठी मी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती काढली होती. त्यानुसार मी विविध प्रकारची नाटकं पाहणं, करणं, त्यासंदर्भातील वाचन, शिफारस पत्राची तरतूद करणं असं सर्व काही मी केलं. एनएसडीची प्रवेशपरीक्षा दिली. त्यासाठी कार्यशाळेलाही मी दिल्लीला गेले होते.
त्यापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मला नोकरीदेखील मिळाली. मी १५ दिवस नोकरीला गेले. पण एनएसडीला निवड झाल्यावर नोकरी सोडावी लागणार, असं म्हणून मी तिथे आधीच राजीनामा दिला. पण उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मी २७ वी उमेदवार होते. एनएसडीला केवळ २६ जागा होत्या. एका जागेच्या अंतराने एनएसडीमध्ये प्रवेश मिळवण्याची माझी संधी हुकली आणि नोकरीही गेली. त्यानंतर वर्षभराने मला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं”, असा किस्सा प्रियदर्शनीने सांगितला.
आणखी वाचा : लग्नाच्या तीन वर्षांनी शर्मिष्ठा राऊतचा पतीबद्दल खुलासा, म्हणाली “प्रेमात कायम…”
दरम्यान, प्रियदर्शनी इंदलकरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी ती एका मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. तिचा ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी २२ मार्चला प्रदर्शित झाला होता.