मृणाल दुसानिसला मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही मृणालची पहिलीच मालिका प्रचंड गाजली होती. आज घराघरांत तिचा चाहतावर्ग आहे. करिअरच्या शिखरावर असताना तिने २०१६ मध्ये लग्न केलं. पुढे, कलाविश्वातून ब्रेक घेत मृणाल देखील अमेरिकेला गेली होती. २०२२ मध्ये तिने गोंडस अशा लेकीला जन्म दिला.

गेल्या महिन्यात तब्बल चार वर्षांनी मृणाल दुसानिस भारतात परतली. अमेरिकेत असताना अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असायची. नुकत्याच ‘सेलिब्रिटी कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या मुलीविषयी खुलासा केला आहे. मृणालच्या लेकीचं नाव नुर्वी असं आहे. हे खास नाव ठेवण्यामागचं कारण तिने या मुलाखतीत सांगितलं आहे.

हेही वाचा : आईने केलं लाडक्या लेकीचं कन्यादान! चेतन-ऋजुताच्या लग्नातील ‘तो’ फोटो चर्चेत, सर्वत्र होतंय कौतुक

मृणाल दुसानिस म्हणाली, “माझी लेक आताच २४ मार्चला दोन वर्षांची झाली. मी तिला माझ्या मालिका वगैरे दाखवते. ‘माझिया प्रियाचं…’ टायटल साँग ऐकून तिने पण ओढणी घेऊन डान्स करण्याचा प्रयत्न केला होता. अजून ती खूपच लहान आहे हळुहळू मोठी झाली की, तिला आई काय करते, बाबांचं काय काम असतं, ते काय करतात? याबद्दल समज येईल.”

हेही वाचा : Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा

नुर्वीच्या नावाबद्दल सांगताना मृणाल म्हणाली, “नुर्वी नावाचा अर्थ आहे ‘लक्ष्मी’. याशिवाय मी आणखी एका ठिकाणी नुर्वी नावाचा अर्थ आशीर्वाद असाही वाचला होता. मी आशीर्वाद या अर्थी तिचं नाव नुर्वी असं ठेवलं. मलाही तिचं नाव खूप आवडलं आणि आमच्या आयुष्यात ती एक आशीर्वाद म्हणूनच आलीये.”

दरम्यान, मृणाल दुसानिस अमेरिकेला जाण्यापूर्वी ‘हे मन बावरे’ या मालिकेत झळकली होती. आता लवकरच अभिनेत्रीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.