Mugdha Vaishampayan & Prathamesh Laghate : मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी म्हणून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांना ओळखलं जातं. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून दोघंही नावारुपाला आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघंही विविध ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करतात. मुग्धा-प्रथमेशच्या गाण्यांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांची मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

मुग्धा आणि प्रथमेश नुकतेच महाबळेश्वर फिरायला गेले होते. यावेळी गायिकेसह तिची बहीण मृदुला वैशंपायन आणि मृदुलाचे पती देखील उपस्थित होते. या फॅमिली ट्रिपचा सुंदर व्हिडीओ मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना महाबळेश्वरमधील विविध जागा, रेस्टॉरंट या सगळ्याची झलक पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरला गेल्यावर मुग्धा-प्रथमेश यांनी विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. पिझ्झा, ब्राऊनी सिझलर, गरमागरम कांदाभजी, महाबळेश्वरचा प्रसिद्ध स्ट्रॉबेरी शेक या सगळ्या चविष्ट पदार्थांची झलक मुग्धाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. याशिवाय पावसाळा सुरू असल्याने संपूर्ण महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. हिरवागार परिसर, निसर्गरम्य वातावरण यामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

मुग्धा-प्रथमेशची महाबळेश्वर ट्रिप

मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आनंदाचे डोही, आनंद तरंग”, “बहिणी-बहिणी…मस्त एन्जॉय केलंत”, “मराठी सिनेविश्वातील गोड जोडी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी मुग्धा-प्रथमेशच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरांत पोहोचलेल्या मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं. दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात, रिती-रिवाजानुसार कोकणात पार पडला होता. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मुग्धा-प्रथमेश एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करत आहेत. या कार्यक्रमांना श्रोत्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याशिवाय मुग्धाची ‘अयोध्या बोलावतेय’ ही यात्रा सुरू आहे. या यात्रेत गीत रामायण गायन, वाल्मिकी रामायण व्याख्यान अशी मैफल रंगते. याचे व्हिडीओ मुग्धा नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.