Nagin Fame Actor Arjun Bijlani Talks About Struggling Days : प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ उतार हे येत असतात. अनेक जण त्यातून मार्ग काढत पुढे जातात. असंच काहीसं झालं होतं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याबरोबर. आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता अर्जुन बिजलानीने त्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

‘नागिन’ फेम अभिनेता अर्जुन बिजलानीने आजवर ‘प्यार का पेहला अध्याय’, ‘तेरे इश्क में’, ‘नागिन’, ‘मिले जब हम तुम्हे’, ‘इश्क में मरजावा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. हिंदी मालिकाविश्वात अर्जुनचं मोठं नाव आहे. यासह तो रिअॅलिटी शोमध्ये होस्टिंगही करतो. अशातच त्याने त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.यासह त्याने त्याच्या मित्राने फसवणूक केल्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान झाल्याचही म्हटलं आहे.

अर्जुन बिजलानीने सांगितला संघर्षकाळ

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तो याबद्दल म्हणाला, “माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आम्ही मुंबईतील टाऊनमध्ये राहायचो, पण आम्हाला माहीमहून मालाडला शिफ्ट व्हावं लागलं. माझं शिक्षण बॉम्बे स्कॉटिश आणि एचआर कॉलेजमधून झालं. नंतर मी, माझी आई व भाऊ आम्ही मालाड येथे वन बीएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहायचो. मी ऑडिशनला जाण्यासाठी आईकडून १०० रुपये घ्यायचो. पूर्वी आम्ही आमच्या गाडीने प्रवास करायचो, पण नंतर ऑडिशनसाठी मला ट्रेनने प्रवास करावा लागला. आम्ही आमची गाडीसुद्धा विकलेली.”

अर्जुन पुढे म्हणाला, “सगळं एका रात्रीत बदललं. आम्ही आमचा २ बीएचके फ्लॅट विकला आणि आम्ही सगळं गमावलेलं. मला माझा पहिला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी ८००० रुपये लागणार होते, त्यामुळे मी माझ्या आईचे दागिने विकले आणि जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा पहिल्यांदा मी आईला सोनाराच्या दुकानात घेऊन गेलो.”

अर्जुन बिजलानीची मित्राने केलेली फसवणूक

अर्जुन त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल म्हणाला, “एका मित्राने माझी फसवणूक केलेली, त्यात मी लाखो रुपये गमावले. मला त्याने ब्लॅक अँड व्हाईट मनी याबद्दल सांगितलेलं आणि त्याने माझ्याकडून ३०-३५ लाख घेतले आणि तो फरार झाला. आजवर मला ते पैसे परत मिळाले नाही. मी ते सर्व पैसे घर खरेदी करण्यासाठी साठवले होते. नंतर मी ‘मिले जब हम तुम्हे’ या मालिकेत काम केलं तेव्हा माझं स्वत:चं घर खरेदी केलं.

मुलाखतीत अर्जुन बायकोबरोबरच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल बोलला आहे. तो म्हणाला, “माझ्याकडे जे काही आहे ते तिचंच आहे, आमचं घरसुद्धा तिच्या नावावर आहे.” असं म्हणत त्याने या अफवा खोट्या असल्याचं सांगितलं.