Navri Mile Hitlerla Fame Actress Vallari Viraj : ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे अभिनेत्री वल्लरी विराज घराघरांत लोकप्रिय झाली. ती साकारत असलेल्या लीला या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्याच्या काळात मालिकांचं शूटिंग जवळपास १२ तास चालतं. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्री दैनंदिन जीवनात त्यांच्या फिटनेसची काळजी कशी घेतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आहाराचं वेळापत्रक, ती कोणकोणते पदार्थ खाते याबाबत खुलासा केला आहे.
वल्लरी विराज म्हणाली, “कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली किंवा केली तर कधीच त्रास होत नाही. एखादा सण आला की, मी गोड खाते जसं, दिवाळीमध्ये मी करंजी खाते कारण, मला करंजी खूप आवडते पण, अर्थात या सगळ्या गोष्टी मी प्रमाणात खाते. मला असं वाटतं की, आपल्याला काही खायची इच्छा झाली आणि ते नाही खाल्ले तर ती इच्छा वाढत जाते. आता आंब्याचा सीजन आहे, तर मी त्याचा पण आस्वाद घेणार पण आंबे सुद्धा मी प्रमाणातच खाणार आहे.”
वल्लरी पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी खाता, तेव्हा वर्कआउट करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा छान खाता तेव्हा तुमचा मूड ही छान राहतो आणि माझ्या बाबतीत हे खरं आहे. जेव्हा मी नीट जेवत नाही, तेव्हा माझा मूड खराब असतो. माझ्या कामाच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो. पण त्याच जागी जेव्हा मी काही छान खाल्लं की माझा मूड उत्तम असतो आणि काम करण्याची ऊर्जा वाढते.”
दुपारच्या जेवणात ‘हा’ पदार्थ आवर्जून खाते…
पुढे, दैनंदिन आहाराविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “जर माझ्या दिवसाच्या आहाराबद्दल सांगायचं झालं, तर मी सकाळी उठून आधी गरम पाणी पिते, त्यानंतर एक फळ, कॉफी आणि नाष्टा करताना ओट्स, पोहे, उपमा किंवा डोसा असे पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करते. नाष्टा करून मी सेटवर जाण्यासाठी निघते. सेटवर मी दुपारच्या जेवणात एक भाकरी, भाजी आणि कोशिंबीर किंवा सलाड खाते. भात मी टाळते, पण दुपारच्या जेवणात मी दही खाते मला ते खूप आवडतं. याशिवाय दही हे पचनासाठी आणि त्वचेसाठीही चांगलं असतं. ५ वाजता मला थोडी भूक लागते तेव्हा मी ब्लॅक कॉफी, एक तुकडा डार्क चॉकलेट किंवा ड्रायफ्रुटस, काकडी- गाजर खाते. ७ वाजता मी माझं डिनर करते त्यात कधी मी पोळी-भाजी, सलाड तर कधी ग्रिल्ड चिकन खाते. रात्री झोपायच्या आधी मी गरम पाणी पिते. आता सध्या उकाडा प्रचंड वाढलाय त्यामुळे मग जास्तीत जास्त मी नारळपाणी पिते.”
दरम्यान, वल्लरी विराज मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नुकतीच अंतराची एन्ट्री झालेली आहे. आता पुढे या मालिकेत काय ट्विस्ट येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ११ वाजता प्रसारित केली जाते.