महाराष्ट्र शासनाने ३५ व्या मराठी व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. यंदा या स्पर्धेत अमृता सुभाषच्या ‘असेन मी..नसेन मी…’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. या स्पर्धेत अनेक मराठी कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे.

मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीला देखील यंदा या व्यावसायिक नाटकाच्या स्पर्धेत राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दुर्गाची म्हणजेच जहागीरदारांच्या मोठ्या सुनेची भूमिका अभिनेत्री शर्मिला शिंदे साकारत आहे. मालिकेबरोबर शर्मिला व्यावसायिक नाटकात सुद्धा काम करत होती. ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकात ती ‘आरती’ ही भूमिका साकारत आहे. याच भूमिकेसाठी अभिनेत्रीला पारितोषिक मिळालं आहे. शर्मिलाचा ‘उत्कृष्ट अभिनय- स्त्री कलाकार’ या विभागात सन्मान करण्यात येणार आहे.

“ऑस्करपेक्षा राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार हे मला नेहमीच खूप मोठे वाटतात. म्हणूनच मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की, ३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला असून, माझं नाटक ‘ज्याची त्याची लव स्टोरी’ यासाठी माझी निवड झाली आहे. हा शासनाचा माझा पहिलाच पुरस्कार असून तुमचं माझ्यावरचं प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. खूप खूप आभार…” अशी पोस्ट शेअर करत शर्मिलाने ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली आहे.

सध्या शर्मिलावर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. सुरुची अडारकर, अभिजीत खांडकेकर, नम्रता संभेराव, अश्विनी कासार, शर्मिष्ठा राऊत, माधुरी भारती या सगळ्या कलाकारांनी कमेंट्स करत शर्मिलाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री शर्मिला शिंदे छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिने ‘पुढचं पाऊल’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ती ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दुर्गाची भूमिका साकारत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.