Kiran Mane Support Nilesh Sabale : गेल्या दोन दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद शरद उपाध्ये यांच्यात शाब्दिक वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चा आगामी दुसरं सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या शोचे सूत्रसंचालन निलेशऐवजी अभिजीत खांडकेकर करणार असल्याचे वृत्त आहे.
या वृत्तावर शरद उपाध्ये यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली’, ‘त्याने सेटवर माझ्याकडे दुर्लक्ष केलं’, अशा शब्दांमध्ये निलेश साबळेवर टीका केली होती. याच टीकेला निलेशने गुरुवारी एक व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं. यावेळी निलेशने सविस्तरपणे त्याची बाजू मांडली. तसंच शरद उपाध्येंनी केलेल्या आरोपांचं सुद्धा खंडन केलं.
शरद उपाध्ये आणि निलेश साबळे यांच्यातील या शाब्दिक वादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच मराठी अभिनेते किरण माने यांनी निलेश साबळेच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. किरण माने यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत “तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये.” असं म्हटलं आहे.
किरण माने इन्स्टाग्राम पोस्ट
किरण माने त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, “निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाही. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. ‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’, असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले, त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची?”
यापुढे किरण माने म्हणतात, “कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करिअरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण, ‘ए चल… हवा येऊ दे'”.
शरद उपाध्ये आणि डॉ. निलेश साबळे वाद
निलेश साबळेने शरद उपाध्ये यांना उत्तर देत “‘झी मराठी’ने डच्चू दिला… हे अशाप्रकारे कोणत्याही माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्त्वाचं आहे. तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने याबाबत थोडी माहिती घ्यायला हवी होती. तुम्ही कायम माझ्यासाठी गुरुतुल्य आहात. आजही तुमच्याबद्दल तोच आदर आहे. मला तुमचं काम फार आवडतं. पण, तुम्ही असं कराल मला खरंच वाटलं नव्हतं.” असं म्हटलं.
याशिवाय निलेशने शरद उपाध्ये यांना म्हटलं, “मी तुमच्याविषयी कधीही वाईट पोस्ट केली नाही किंवा तुम्हाला त्रास दिलेला नाही. मग तुम्ही हे पुन्हापुन्हा का करत आहात? या घटनेला १० वर्षे झालीत तरी सुद्धा हे का होतंय? भंगारवाला, अहंकारी, हीन दर्जाचा, सर्वनाश, अध:पतन, खालच्या दर्जाचा हे सगळं तुम्ही ६ वर्षांपूर्वीच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तुम्ही इतकं सगळं बोलायचं आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं?”