Nilesh Sabale & Sharad Upadhye : प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी काही दिवसांपूर्वीच फेसबूक पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर टीका केली होती. यानंतर निलेशने सविस्तर व्हिडीओ शेअर करत याप्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली. कोणतीही पोस्ट लिहिताना नीट माहिती घेणं आवश्यक आहे. सरांचा मी फॅन होतो आणि कायम राहीन असंही अभिनेत्याने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

आता नुकत्याच ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. निलेश साबळेने हा विषय माझ्यासाठी कायमचा संपला असून मी कायम शरद उपाध्ये सरांचा आयुष्यभर आदर करेन असं सांगत पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

शरद उपाध्ये प्रकरणाविषयी बोलताना निलेश साबळे म्हणाला, “मी तो विषय आता विसरून गेलोय, तुम्ही विचारलात म्हणून…कारण, एखादी गोष्ट तेव्हाच थांबते जेव्हा आपण त्याविषयीचं बोलणं थांबवतो. मी त्या व्हिडीओमध्ये नमूद केल्याप्रमाणे सन्माननीय शरद उपाध्ये सरांनी यापूर्वी सुद्धा दोन-तीनवेळा अशा पोस्ट केल्या होत्या. तेव्हा मी गोष्टी सोडून दिल्या होत्या. सहा वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी अशीच एक पोस्ट लिहिली होती…त्यातही त्यांनी बरंच काही म्हटलं होतं.”

अभिनेता पुढे म्हणाला, “शेवटी सांगायचं काय तर कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं. कलाकार व्यक्त झाले तरी समस्या निर्माण होते आणि एखादा कलाकार व्यक्त झाला नाही तरी समस्या निर्माण होतात. पूर्वी या गोष्टी व्हायच्या नाहीत. पण, आता काय झालंय…प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्यामुळे मला अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जरी लिहायचं असेल तरी मी पटकन लिहू शकतो. माझी पोस्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर, दुसऱ्या मिनिटाला ते सुद्धा ती पोस्ट वाचू शकतात. आता सोशल मीडिया संवाद साधण्याचं नवीन माध्यम झालंय पण, त्यावर काहीही लिहिणं हे योग्य नाहीये.”

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे सांगताना अभिनेता म्हणाला, “मला असं वाटतं की अलीकडच्या काळात हे फार सुरू झालंय…आपण एखाद्या गोष्टीवर काहीही बोलायच्या आधी प्रतिक्रिया यायला सुरू होते. त्या घटनेनंतर अनेकांना असं वाटलं, ‘अरे निलेश साबळेचा हा चेहरा आम्हाला माहितीच नव्हता’, ‘अरे बरं झालं तुम्ही निलेशचा खरा चेहरा आमच्यासमोर आणला’, ‘निलेश साबळे असा असेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं.’ असा विचार अनेकांनी केला. कलाक्षेत्रात तुमची एक इमेज असते आणि ती जर अशा प्रसंगांमुळे डागाळली गेली तर, पुढच्या कामांवर त्याचा निश्चित परिणाम होतो. मला माझेच लोक विचारू लागले…तू असा वागला होतास का? मग मी ठरवलं की, नाण्याची एक बाजू लोकांना समजली आता दुसरी बाजू कळणं फार गरजेचं आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा हे सगळं सांगते…तेव्हा लोकांना वाटतं अरे हेच बरोबर आहे…त्यामुळे यावेळी सविस्तर बाजू मांडणं मला महत्त्वाचं वाटलं.”

“सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपला मुद्दा प्रामाणिकपणे मांडला पाहिजे असा विचार मी केला. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे पण, त्यांनी नीट माहिती घेतली हवी होती. गैरसमजातून झालेला तो सगळा प्रकार होता…मी सगळ्यांना एकच सांगेन आता तो विषय माझ्या बाजूने पूर्णपणे संपलाय. शरद उपाध्ये सर आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांचा आयुष्यभर आदरच करेन.” असं निलेश साबळेने स्पष्ट केलं.