Paani Movie Fame Marathi Actres Rucha Vaidya Wedding : यंदाच्या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. अंकिता वालावलकर, अभिषेक रहाळकर, दिव्या पुगांवकर, कौस्तुभ गायकवाड असे अनेक सेलिब्रिटी गेल्या काही महिन्यांत लग्नबंधनात अडकले. आता मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातून मुख्य भूमिकेत एक नवोदित अभिनेत्री झळकली होती. या सिनेमाची निर्मिती बॉलीवूडची स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राने केली होती. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री रुचा वैद्यने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटातून रुचा घराघरांत लोकप्रिय झाली. या सत्य घटनेवर आधारित सिनेमाला यंदाच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रुचाने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा उरकला होता. यानंतर रुचा लग्न केव्हा करणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील सुंदर असा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

रुचा वैद्यच्या पतीचं नाव यश किरकिरे आहे. नवऱ्याबरोबरचा लग्नमंडपातील सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘Hubby’ लिहिलं आहे. याशिवाय रुचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संगीत सोहळ्यातील खास क्षण देखील शेअर केले आहेत. सध्या रुचा वैद्यवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

अभिनेत्री रुचा वैद्य अडकली विवाहबंधनात ( rucha vaidya wedding )

दरम्यान, रुचा वैद्यच्या पहिल्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर ‘पाणी’मध्ये अदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी आणि विकास पांडुरंग पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कलेक्शनच्या दृष्टीकोनातून फार चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी, या सिनेमाची प्रेरणादायी कथा प्रत्येकाला भावली.