Parag Tyagi Shares Emotional Post For Late Wife Shefali Jariwala : ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे काही दिवसांपूर्वीच २७ जून २०२५ रोजी दुर्दैवी निधन झाले. यानंतर तिचा नवरा अभिनेता पराग त्यागीवर पत्नीच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला. पराग अजूनही शेफालीच्या निधनामुळे दु:खात असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून कळतं. अशातच आता त्याने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे.
पराग पत्नीच्या निधनानंतर अनेकदा सोशल मीडियावर तिच्या आठणींबद्दल बोलताना दिसतो. नुकतच त्याने त्यांच्या लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. यामधून त्याने म्हटलं की, “माझं प्रेम, माझा जीव, माझी परी. जेव्हा १५ वर्षांपूर्वी मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला कळलेलं की तूच ती एकमेव व्यक्ती आहेस.”
पराग पुढे म्हणाला, “११ वर्षांपूर्वी तू त्याच तारखेला माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तू माझ्यावर खूप प्रेम केलं. तू माझं आयुष्य खूप सुंदर बनवलं. तू मला शिकवलंस की, मस्ती करत आयुष्य कसं जगायचं आणि आता मी आपल्या त्या सगळ्या आठवणींना उजाळा देत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन. १२ ऑगस्ट २०१० ते पुढे कायम एकत्र असू.”
परागने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे व शेफालीचे जुने फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. परागच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट केल्याचेही पाहायला मिळत आहे. शेफालीसुद्धा अनेकदा परागचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असायची.
दरम्यान, दिवंगत अभिनेत्री शेफाली जरीवाला व पराग त्यागी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी १२ ऑगस्ट २०१४ रोजी लग्न केलं होतं. शेफालीचं हे दुसरं लग्न होतं. यापूर्वी तिचं पहिलं लग्न हरमीत सिंगशी झालं होतं. तिने २२व्या वर्षी २००४ साली हरमीतसह लग्न केलं होतं. परंतु, त्यांनी पुढे अवघ्या ५ वर्षांतच एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि २००९ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.