टीव्हीवरील काही लोकप्रिय मालिकांपैकी सर्वांचीच आवडती मालिका म्हणजे ‘सीआयडी’. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘सीआयडी’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात शिवाजी साटम (एसीपी प्रद्युम्न), दयानंद शेट्टी (​​दया) आणि आदित्य श्रीवास्तव (​अभिजीत) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपुर्वी मालिकेत शिवाजी साटम यांची एक्झिट दाखवण्यात आली.

शिवाजी साटम यांच्या एक्झिटनंतर मालिकेत त्यांच्या जागी पार्थ समथानची एसीपी आयुष्मान म्हणून एन्ट्री झाली. शिवाजी साटम यांच्याऐवजी आलेल्या पार्थ समथानचं मालिकेतील पात्र काही काळासाठीच असून त्याचं कथानक संपल्यानंतर तो एक्झिट घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. काही दिवसांपुर्वी पार्थने स्वत: पिंकव्हिलाला याबद्दल माहिती दिली होती.

पिंकव्हिलाला सांगितल्यानुसार पार्थ ‘सीआयडी २’ मालिका सोडत आहे. कारण शिवाजी साटम पुन्हा शोमध्ये परतले आहेत. पार्थ या शोमध्ये फक्त काही भागांसाठीच येणार होता, परंतु कथानकामुळे त्याचा शोमधील मुक्काम वाढला. पण त्याच्याकडे काही इतर कामं आहेत, जी त्याला वेळेत पूर्ण करायची आहेत. त्यामुळे तो या मालिकेतून निरोप घेणार आहे. अशातच आता त्याने एक्झिटनंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये पार्थ असं म्हणतो, “दया सर आणि अभिजीत सरांचा चाहता असण्यापासून ते त्यांच्याबरोबर काम करण्यापर्यंत… मला या कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्याबरोबर बसून आयुष्याबद्दलच्या आणि शूटिंगच्या अनेक गोष्टी ऐकणं हे माझ्यासाठी खूप मजेदार होतं.” यापुढे त्याने “संपूर्ण सीआयडी टीम खूप दयाळू, मदत करणारी आणि प्रेमळ होती. अशी टीम आजच्या जगात मिळणं खूपच दुर्मिळ आहे” असं म्हटलं.

पार्थने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्समध्ये “आम्ही तुझ्या भूमिकेला खूप मिस करु”, “तुझा सीआयडी प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणादायी होता”, “ट्रोल होण्यापासून ते सीआयडीच्या चाहत्यांकडून प्रेम मिळवण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच चांगला होता”, “पार्थ तुला सीआयडीमध्ये पाहून खूप आनंद झाला”, “भविष्यातील कामासाठी शुभेच्छा” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, ‘सीआयडी ​​२’च्या आधी पार्थ समथानने ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्याने काही चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. ५ वर्षांच्या ब्रेकनंतर पार्थ ‘सीआयडी ​२’मधून छोट्या पडद्यावर पुन्हा परतला होता. याबद्दल त्याला काही प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले होते. मात्र, त्याची भूमिका फार कमी काळासाठी होती. या भूमिकेनंतर आता पार्थ पुढे कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.