लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राची पिसाटने काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी तिला केलेल्या आक्षेपार्ह मेसेजचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले होते. अभिनेत्याने फेसबूक मेसेंजरवर ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’, अशी मागणी केली होती आणि या मेसेजचे स्क्रीनशॉट प्राचीने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासूनच सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये या प्रकरणाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे.

याप्रकरणी अद्याप सुदेश म्हशीलकरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुदेश म्हशीलकरांच्या मेसेजनंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी प्राचीकडे ‘असं काही नसेल’, ‘त्यांचं अकाउंट कदाचित हॅक झालं असेल’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशातच आता प्रसिद्ध संगीतकार आणि अभिनेते राहुल रानडे यांनीही प्राचीला काही मेसेज केले आहेत.

मराठी अभिनेते आणि संगीतकार राहुल रानडे यांनी प्राची पिसाटला मेसेज केलेत. हे मेसेज असे आहेत की, “हॅलो PP, फुल बॅटिंग चालू आहे तुझी. सगळ्या न्यूज पोर्टल्सने हा मुद्दा उचलून धरला आहे. खरंतर मी सुदेशला वैयक्तिकरित्या ओळखतो. मला एक सांग… त्याने नक्की कोणत्या वेळेला हे मेसेज केले होते? कारण सामान्यत: लोक रात्री नशेत असे मेसेज करतात.”

राहुल रानडेंच्या या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीनं त्यांना उत्तर देत असं म्हटलं, “अजून एक नमुना… तू पागल आहेस का? काय बोलतोय कळतंय का? नशेत असल्याने मुलींना मेसेज करणं हे कुठलं कारण होत नाही. ते गैरवर्तनच आहे. मी कुणाचं मनोरंजन करण्याचा ठेका घेतलेला नाही. किंवा कोणत्याही मुलीने मग ते वेळ, वय आणि परिस्थिती बघून गैरवर्तन सहन करण्याचा ठेका घेतलेला नाही.”

प्राची पिसाट इन्स्टाग्राम स्टोरी

यापुढे प्राचीने म्हटलं, “छोटं असो किंवा मोठं गैरवर्तन झालं तर त्याविरोधात मुलीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुझी ही मानसिकता असेल, तर तू नशेत असताना आता तुझे किती चॅट बाहेर निघतील हे तुला कळणारही नाही.” त्यामुळे सुदेश म्हशीलकरांच्या मेसेजमुळे हे प्रकरण आधीच गंभीर असताना आता यात राहुल रानडेंनी उडी घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्राचीने माध्यमांनाही आवाहन केलं आहे.

याबद्दल तिने पोस्ट शेअर करत कृपया हे लक्षात घ्या की, मी फक्त माझ्या उत्तराच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, त्यांच्यावर आरोप नव्हता केला. मी स्पष्टपणे सांगितले होते की, एक तर अकाउंट हॅक झालं आहे हे सिद्ध करा किंवा माफी मागा. पण याबद्दल ते गप्प राहून काहीच उत्तर देत नसतील तर माध्यमांनी त्यांच्याबद्दलच्या वृत्तांना मी जबाबदार नाही.”

यापुढे प्राचीने तिच्या पोस्टमध्ये असं म्हटलं, “मी अगदी वेळेवर स्वतःसाठी उभी राहिली. कोणत्याही मुलीला तिच्या स्पष्ट, ठाम आणि तिने स्वतःसाठी उभे राहिल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ नये. मला मुलगी असल्याबद्दल आणि ठाम भूमिका घेतल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ नये. समर्थनाबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आज आणि भविष्यात माध्यमांकडून जे काही छापले जाईल, त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार नाही.”