Pranit More Re-entry In Bigg Boss 19 :’बिग बॉस १९’ या शोचा प्रवास जसजसा पुढे जात आहे, तितकीच या शोमधली उत्कंठा वाढत आहे. शोमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. अशातच आता ‘बिग बॉस १९’च्या घरात आणखी एक रोमांचक वळण येणार आहे, कारण प्रेक्षकांचा आवडता कॉमेडीयन प्रणित मोरे पुन्हा शोमध्ये परत येत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी त्याला डेंग्यू झाल्यामुळे शो सोडावा लागला होता. त्याच्या अचानक जाण्याने घरातील सदस्य आणि असंख्य चाहत्यांनाही धक्का बसला होता. मात्र, आता तो शोमध्ये पुन्हा येत आहे. एका खास पद्धतीनं शोमध्ये त्याची एन्ट्री होणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.

स्टोअर रूममधून होणार धमाल एन्ट्री!

शुक्रवारच्या भागात प्रणित मोरे पुन्हा घरात प्रवेश करणार आहे. नवीन प्रोमोमध्ये दाखवले आहे की, त्याची एन्ट्री स्टोअर रूममधून होईल. स्टोअर रूमची घंटी वाजताच नीलम गिरीला तिथे कोणीतरी आहे असं जाणवतं आणि ती बाहेर येऊन सर्वांना सांगते की आत कोणीतरी आहे. हे ऐकून अभिषेक बजाज आणि गौरव खन्ना लगेच ओळखतात की प्रणितच आला असावा.

नंतर फरहाना स्टोअर रूममध्ये जाते. स्टोअर रूमकडे पाहिल्यानंतर ती थक्क होते. तर मृदुल आनंदाने धावत जाऊन अगदी उत्सुकतेने स्टोअर रूममध्ये पाहतो. या प्रोमोत घरातील अनेक सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. दरम्यान, या प्रोमोमध्ये प्रणितचा चेहरा किंवा तो अगदी स्पष्ट दिसत नसला तरी त्यात कोणीतरी लपल्याची छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. त्यावरून सगळेच तो प्रणितच असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

प्रोमोखालील कमेंट्समध्येसुद्धा प्रेक्षकांनी ‘भाऊ इज बॅक’, ‘शेर आया’, ‘आता पुन्हा मज्जा येणार’, ‘भाऊ तुझं स्वागत आहे’, ‘किंग इज बॅक’, ‘असं फक्त प्रणितच करू शकतो’ या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी या प्रोमोत स्टोअर रूममधून प्रणित आला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात, आता हा अंदाज किती खरा आहे हे आज म्हणजेच शुक्रवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

घरात होणार ‘द प्रणित मोरे शो’

यावेळी प्रणित फक्त स्पर्धक म्हणूनच नाही, तर ‘बिग बॉस’च्या घरात ‘द प्रणित मोरे शो’चे सूत्रसंचालनही करणार आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या खास विनोदी अंदाजात प्रणित घरातील सदस्यांची मजामस्करी करणार आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ने प्रणितला एक खास पॉवर दिली आहे. ती म्हणजे, एका नॉमिनेटेड स्पर्धकाला घराबाहेर जाण्यापासून वाचवण्याची.

या आठवड्यात गौरव खन्ना, नीलम गिरी, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज घराबाहेर जाण्याच्या टप्प्यावर आहेत. चाहत्यांचा अंदाज आहे की प्रणित कदाचित गौरव खन्ना किंवा अशनूर कौर यापैकी कोणाला तरी घराबाहेर जाण्यापासून वाचवू शकतो.