‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट येत असतात. आता मालिकेतील मुख्य नायिका व कोळी कुटुंबाची सून मुक्ता एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिने हा नवीन लूक करण्यामागे एक खास कारण आहे. आपल्या मुलांच्या प्रेमाखातर एक आई काय काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताई. मुक्ताचं हे नवं रुप सावनीला सळो की पळो करून सोडणार आहे. आता मुक्ता नेमकी कोणत्या रुपात झळकणार आहे याबद्दल जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ता नवीन लूक करण्यामागचं मुख्य कारण आहे तिची लाडकी सईमाऊ. सईवर मुक्ताचं जीवापाड प्रेम आहे. सईशिवाय ती एक क्षणही राहू शकत नाही. मात्र, चिमुकली सई सध्या तिच्या मुक्ताईवर रुसली आहे. मुक्ताईचं पूर्वीसारखं आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमज तिने करुन घेतला आहे. म्हणूनच तर रागावलेली सई सध्या मुक्तापासून दूर सावनीच्या घरी राहत असते. आता सईचा रुसवा घालवण्यासाठी मुक्ताने एक नवी युक्ती शोधून काढली आहे. लाडक्या लेकीसाठी ती नवीन वेश धारण करणार आहे.

मुक्ता वृद्ध गोदा मावशीचा वेश धारण करुन सावनीच्या घरी सईला भेटण्यासाठी जाणार आहे. नऊवारी साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू, चष्मा, गळ्यात लहान मंगळसूत्र असा लूक करून मुक्ता सावनीच्या घरी एन्ट्री घेणार आहे.

हा नवा लूक साकारण्यासाठी मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे फारच उत्सुक आहे. ती म्हणाली, “पहिल्यांदाच मी अशाप्रकारची भूमिका साकारत आहे. गोदा हे नवं पात्र साकारण्यासाठी माझी ४ वेळा लूक टेस्ट झाली. संपूर्ण टीमने हा लूक साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मुळात गोदा नागपूरची आहे. त्यामुळे हे पात्र साकारण्याआधी मला नागपूरची भाषा शिकायला मिळाली. मुक्ताचं हे रुप आजवर मालिकेत कधीही पाहायला मिळालं नाहीये. मला स्वत:ला हे पात्र साकारताना मजा येत आहे. प्रेक्षकांनाही गोदा नक्कीच आवडेल याची खात्री आहे” अशी भावना स्वरदा ठिगळेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाते. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची आठ वाजताची वेळ बदलून साडेसहा करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta mukta new look for daughter sai watch new promo sva 00