छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना तो बोलतं करताना दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली आणि लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याबरोबरच खुपणाऱ्या गोष्टींवरही त्यांनी त्यांच्या शैलीतील खरमरीत उत्तरं दिली. याच कार्यक्रमात अवधूत गुप्तेने एक छोटासा खेळ ठेवला होता, या खेळात एका गिफ्ट बॉक्समधून वेगवेगळ्या वस्तु काढण्यात आल्या आणि त्या वस्तु कोणाला गिफ्ट म्हणून द्याव्याशा वाटतात याचं उत्तर राज ठाकरे यांना द्यायचं होतं.

आणखी वाचा : शिंदेशाही आणि घराणेशाहीबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर म्हणाले, “लोकांचे प्रश्न…”

या धमाल राऊंडमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी कोणाला जास्त उपयोगी पडतील याची मजेशीर उत्तरं दिली. याच राऊंडमध्ये अवधूतने जेव्हा ‘वॉशिंग पावडर’चं पाकीट बाहेर काढलं तेव्हा राज ठाकरे म्हणाले, “अरे वॉशिंग पावडर म्हणजे सत्ताधारी पक्ष, मला असं वाटतं की हा साबण त्वरित दिल्लीला पाठवून दे. तिथे कितीही मळलेला माणूस गेला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो.”

या उत्तरावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवाया आणि भाजपामध्ये गेल्यावर आरोपमुक्त होणं या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी मिश्किल टोला लगावला आहे. अवधूत गुप्ते यांचा हा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे, याबरोबरच याचे सगळे भाग तुम्हाला ‘झी ५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray speaks about ruling party on the sets of khupte tithe gupte talk show avn