Reshma Shinde Talks About Affair Rumors With Akshar Kothari : रेश्मा शिंदे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचा तिथे मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, अनेकदा सोशल मीडियावर कलाकारांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातात. अशीच एक अफवा रेश्माबद्दलही पसरली होती, याबद्दल तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

रेश्मा सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. यामध्ये सध्या मोठा ट्विस्ट आला असून मालिकेच्या कथानकात १२ वर्षांपूर्वी जानकी व हृषिकेश कसे होते, त्यांची प्रेमकहाणी कशी आहे याबद्दल पाहायला मिळत आहे. अशातच आता रेश्माने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने तिच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.

अक्षरबरोबरच्या अफेअरच्या अफवेबद्दल रेश्माची प्रतिक्रिया

रेश्माला मुलाखतीत तुझ्याबद्दल पसरलेली एक अफवा कोणती आहे याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “माझं आणि माझा एक खूप जवळचा, खूप चांगला मित्र अक्षर कोठारी आमच्याबद्दल मध्येच काहीतरी आलं होतं. आमच्या घरच्यांनाही धक्का बसला होता. तेव्हा आम्ही दोघेही वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या नात्यांमध्ये होतो. चुकीच्या ट्रोलिंगमुळे आमच्या खासगी आयुष्यावर पण परिणाम होऊ शकतो, पण सुदैवाने तो नाही झाला; कारण आम्ही खूप चांगले मित्र होतो.

रेश्मा पुढे म्हणाली, “ही एक अत्यंत विचित्र अफवा होती. आम्ही लग्न करणार आहोत, आमचं अफेअर आहे वगैरे गोष्टी पाहायला मिळत होत्या.” रेश्माला पुढे याच मुलाखतीत तुला कोणी कधी फिल्मी स्टाइल प्रपोज केलेय का असं विचारल्यावर ती म्हणाली, “कधीच नाही. मला खूप आवडतं, मी खूप फिल्मी आहे. मी माझ्या नवऱ्यालाच प्रपोज केलं होतं. जेव्हा आयुष्यात पुढे जायचं असं ठरलं, तेव्हा मी त्याला वेगळ्या पद्धतीने प्रपोज केलेलं.”

रेश्माने पुढे तिला कोणत्या गोष्टीची भीती वाटते याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “मला जवळची माणसं दूर जाण्याची भीती आहे.” पुढे तिने हृतिक रोशनबरोबर काम करायला आवडेल असं सांगितलं आहे.