Actor on casting couch: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबाबत चाहत्यांना अनेकदा कौतुक वाटते. कलाकारांचे दिसणे, त्यांचा अभिनय, त्यांच्या गाजलेल्या भूमिका, त्यांचे राहणीमान, जीवनशैली, त्यांची स्टाइल आणि अशा अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते.

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा काळ कलाकारांसाठी सोपा नसतो. अनेकदा त्यांना नकाराचा सामना करावा लागतो. काम मिळवण्यासाठी काही महिने, काही वर्ष वाट पाहावी लागते. छोट्या भूमिका ते मुख्य भूमिकेपर्यंतच्या प्रवासात अनेक कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. अनेकांना कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागतं.

गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊच, निर्माते, दिग्दर्शकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल अनेक अभिनेत्रींनी वक्तव्य केले आहे. मात्र, कास्टिंग काऊचला फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांनादेखील सामोरे जावे लागते.

आता पवित्र रिश्ता फेम अभिनेता ऋत्विक धनजानीने त्याल्या आलेल्या अनुभवाबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्याने नुकतीच टू गर्ल्स अँड टू कप्स या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने सांगितले की, तो २० वर्षांचा असताना मुंबईच्या आरामनगरमध्ये ऑडिशनसाठी गेला होता. त्यावेळी त्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.

“तुला लगेच माझ्याबरोबर माझ्या…”

अभिनेता म्हणाला, “मी ऑडिशनसाठी रांगेत उभा होतो, तेव्हा कास्टिंग डायरेक्टर माझ्याकडे आला आणि मला स्टुडिओमध्ये घेऊन गेला. तो मला म्हणाला की तुझी निवड झाली. ते ऐकल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. मला तो देवदूतासारखा वाटला. मी खूप खूश झालो आणि त्याचे आभार मानू लागलो. त्यानंतर तो मला म्हणाला की, तुला लगेच माझ्याबरोबर माझ्या ऑफिसला यायला लागेल. मी त्यासाठी तयार झालो.”

“त्या कास्टिंग डायरेक्टरने मला विचारले की तू इथे कसा आला आहेस? मी त्याला सांगितले मी दुचाकीवरून आलो आहे. त्यावर तो मला म्हणाला की ठीक आहे, आपण तुझ्या गाडीवरून जाऊ. मी तुझ्या मागे बसतो. मला त्याचवेळी समजायला पाहिजे होते की काहीतरी गडबड आहे.”

“मला त्यातून सावरायला बराच वेळ…”

पुढे काय घडले हे सांगत अभिनेता म्हणाला, “गाडीवर बसल्यानंतर कोणकोणत्या कलाकारांना त्याने लाँच केले आहे हे सांगायला सुरूवात केली. मात्र, जेव्हा आम्ही त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो, त्यावेळी काही चुकीचे होत असल्याचे मला वाटले, कारण तिथे कोणतेही ऑफिस नव्हते. एक किरणा दुकान आणि बन मस्काचे स्टॉल होते. तो मला एका गल्लीत घेऊन गेला. मला वाटले की तिथे एखादा बंगला असेल. पण, मला तिथे एक कुलूप असलेले घर दिसले. त्याने ते कुलूप उघडले, तिथे खूप अंधार होता. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी त्याने मला बोलावले. तिथे त्याने ऑफिस असल्याचे सांगितले. मी इतका घाबरलो होतो की माझी पँट ओली झाली होती.”

“त्याने मला शोरील (showreel) दाखवायला सांगितले आणि मध्येच थांबवत तो मला म्हणाला की, तुला या इंडस्ट्रीत जास्त मेहनत करण्याची गरज नाही. तुला हुशारीने काम करावे लागेल. मग तो मला स्पर्श करू लागला. त्याने स्पर्श करताच मी घाबरलो. मी फक्त २० वर्षांचा होतो. मी थरथर कापत होतो. कसे तरी मी तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झालो,” असे म्हणत अभिनेत्याने आपबिती सांगितली.

“माझ्या मित्राने मला समजावून सांगितले की, हे इंडस्ट्रीमध्ये घडते आणि ते काही मोठे काम नाही. पण, मला त्यातून सावरायला बराच वेळ लागला.”

दरम्यान, अभिनेत्याने असेही सांगितले की, घडल्या प्रकारानंतर मी अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार केला होता, पण मी थांबलो. अभिनेता टेलिव्हिजन इंडस्टीमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक ठरला आहे.