Damini 2.0 Marathi Serial Launch Date : ‘दामिनी’ ही मराठी दूरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. १९९७ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. जवळपास ६ ते ७ वर्षे या मालिकेची तुफान क्रेझ होती. प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी या मालिकेत दामिनी हे पात्र साकारलं होतं. निर्भीड पत्रकार असलेल्या दामिनीची कहाणी या मालिकेच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळाली होती. आता हीच ‘दामिनी’ एका नव्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जवळपास १८ वर्षांनी सह्याद्री वाहिनीवर पुन्हा एकदा ‘दामिनी’चं नवीन पर्व सुरू होणार आहे. यंदा यामध्ये अभिनेत्री किरण पावसे मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रतीक्षा लोणकर यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करून किरणला या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकताच ‘दामिनी’च्या नव्या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आलेला आहे. यामध्ये प्रेक्षकांना लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग ( इन्स्पेक्टर दिव्या खानोलकर ) आणि अभिनेता सुबोध भावे यांची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ध्रुव दातार यामध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे.

‘दामिनी’ मालिका येत्या १३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर पाहायला मिळेल.

प्रतीक्षा लोणकर याविषयी म्हणतात, “दामिनी ही दूरदर्शन सह्याद्रीवरील पहिली दैनंदिन मालिका होती आणि याच मालिकेत मध्यवर्ती भूमिका करण्याची संधी मला मिळाली होती. तुम्ही सर्वांनी माझ्यावर, मी साकारलेल्या दामिनीच्या भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. म्हणूनच या मालिकेचे १५०० हजार भाग आम्ही पूर्ण करू शकलो. आता या मालिकेचा नवा सीझन तुमच्या भेटीला येत आहे. माझी मालिका सुद्धा तेव्हा ऑक्टोबरमध्येच सुरू झाली होती आणि आता हा नवा सीझन सुद्धा ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, प्रेक्षकांनी जसं माझ्यावर प्रेम केलं तसंच प्रेम ते नव्या दामिनी मालिकेवर सुद्धा करतील.”

‘दामिनी’ पुन्हा एकदा नव्या रूपात सुरू होणार असल्याने प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे. नव्या मालिकेसह जुनी मालिका सुद्धा पुन्हा एकदा प्रसारित करावी अशी मागणीही काही नेटकऱ्यांनी केली आहे.