Salman Khan Bigg Boss Show Salary : बॉलीवूड अभिनेता सलमान खानबाबत सोशल मीडिया आणि सर्वच माध्यमांमध्ये अनेकदा विविध चर्चा होत असतात. त्यापैकीच एक म्हणजे त्याच्या ‘बिग बॉस’च्या मानधनाची चर्चा. सलमान खान हा ‘बिग बॉस’च्या एका एपिसोडसाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. त्याबद्दल अनेक तर्क-वितर्क केले जातात. परंतु, आता याबद्दल स्वत: ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे.
सध्या ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन सुरू आहे. या शोचं होस्टिंग सलमान खान करीत आहे. त्याच्या होस्टिंगवरही टीका होत आहे. सलमान काही ठरावीक स्पर्धकांबाबत दुजाभाव करीत असल्याच्या टीका काही प्रेक्षकांकडून केल्या जात आहेत. या सगळ्या टीका आणि चर्चांवर ‘बिग बॉस’चे निर्माते ऋषी नेगी (Banijay Asia and EndemolShine India) यांनी India Today ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. तसेच सलमान खानला ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडपूर्वी नेमकं काय सांगितलं जातं याबद्दलही त्यांनी खुलासा केला.
ऋषी नेगी म्हणाले, “सलमान शक्य असेल तेव्हा स्वतःच एपिसोड पाहतो. कधी वेळ नसेल, तर वीकेंडला आम्ही त्याच्यासह घरातील एक-दोन तासांचं फुटेज पाहतो, ज्यात आठवडाभरात झालेल्या महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला जातो. सलमानला घरात काय घडतंय याची पूर्ण कल्पना असते. त्याचे अनेक मित्र आणि ओळखीचे लोकही हा शो पाहतात आणि त्याला थेट फीडबॅक देतात. त्यामुळे तो स्वतःचं मत बनवतो. तसेच निर्मात्यांचंही एक मत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसादही लक्षात घेतला जातो आणि मग सगळं एकत्र करून वीकेंडचे एपिसोड तयार केले जातात.”
सलमानवर अनेकदा शोबद्दलच्या होस्टिंगबद्दल पक्षपातीपणाचे आरोप केले जातात. त्याबद्दल ऋषी नेगी सांगतात, “सलमानवर केले जाणारे पक्षपातीपणाचे आरोप काही नवीन नाहीत. काही प्रेक्षक तर म्हणतात की, त्याच्या कनात असलेल्या एअरफोनमधून प्रॉडक्शन टीम सलमानला काय बोलायचं ते सांगते. पण मला वाटतं की, ज्यांना सलमान खान माहीत आहे, त्यांना ठाऊक आहे की, त्याला त्याच्या मनाविरुद्ध काही बोलायला लावणं अशक्य आहे.”
त्यानंतर ऋषी नेगी यांनी सलमान खानला दर सीझनला १५० ते २०० कोटी मिळत असल्याच्या चर्चांवर उत्तर दिलं, ते म्हणाले, “मानधनाबाबत सलमान आणि जिओ हॉटस्टार यांच्यात करार झालेला आहे, त्यामुळे त्याच्या मानधनाचे नेमके आकडे मला माहीत नाहीत. पण एवढं मात्र नक्की की, तो त्या प्रत्येक पैशाचा हकदार आहे. आमच्यासाठी तो वीकेंडला असणं एवढंच पुरेसं आहे.”
