Bigg Boss Marathi 19 ‘बिग बॉस १९’ च्या ताज्या वीकेंड का वार भागात होस्ट सलमान खानने अमाल मलिकवर नाराजी व्यक्त केली. दिग्दर्शक अभिनव कश्यपने खोटे आरोप केलेत, त्यावर अप्रत्यक्ष टीका करत एपिसोड सुरू झाला. नंतर, गौहर खान शोमध्ये सामील झाली. तिने तिचा दीर आवेज दरबारची बाजू घेतली, तसेच अमालच्या वक्तव्यांबद्दल त्याच्यावर टीका केली. गौहर गेल्यावर सलमानने थेट अमालला सुनावलं. त्याला त्याच्या वागण्याबद्दल त्याला फटकांले. संतापलेल्या सलमान खानने अमालशी बरीच वर्षे न बोलण्याचं कारणही सांगितलं.
गौहरने आवेजला आपली मतं ठामपणे मांडण्याचा सल्ला दिला आणि अमालचा तिने खरपूस समाचार घेतला. ती म्हणाली, “घरात अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, ज्यामुळे लोकांची मनं दुखावली. पहिल्या दोन आठवड्यात अमाल म्हणाला की तू त्याच्याशी भांडणार नाहीस कारण तो तुला २० लाख रुपयांचा व्यवसाय देतो. गेल्या आठवड्यात तो म्हणाला की तुझ्या ३० मिलियन फॉलोअर्सपैकी २५ मिलियन फॉलअर्स फेक आहेत. तू त्याला २० लाख दान म्हणून देत होतास का? अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत ज्या योग्य नाही. अमाल आणि त्याचा गट अत्यंत वाईट आहे. तो स्वतःच त्याच्या स्वतःच्या मित्रांबद्दल वाईट बोलतो म्हणून तो स्वतःच मागे पडतोय. अमाल, मला तू खूप आवडतोस. पहिल्या दोन आठवड्यात तू मनोरंजन करत होतास, पण आता तुझं वागणं दुतोंडी आहे.”
गौहर खान गेल्यानंतर सलमान खान अमाल मलिकशी बोलला. त्याने अमालला वागणुकीबद्दल फटकारले आणि म्हणाला, “अमाल, जेव्हा तू इथे आलास होतास, तेव्हा तू मला म्हणाला होता की की तू तुझी प्रतिमा सुधारण्यासाठी इथे आला आहेस. पण तसं अजिबात घडत नाहीये. तुझे वडील तुझ्या वतीने सर्वांची माफी मागत आहेत. तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत हस्तक्षेप करून, लोकांच्या कुटुंबाबद्दल वाईट बोलत आहेस. तू इतकं वाईट बोलतोय की आम्ही ते दाखवूही शकत नाही. तुझ्या चाहत्यांचा विचार कर. त्यांनी तुला आदर्श म्हणून पाहावं की तुझ्यासारखं व्हावं? सॉरी म्हणू नकोस कारण तुझ्या सॉरीला काही किंमत नाही.”
“माझ्यावर खूप आरोप होत आहेत, कारण मी तुला लहानपणापासून ओळखतो. मी तुला काहीच बोलणार नाही, असं म्हटलं जातंय. पण मला तुझी समस्या माहित आहे, आणि म्हणूनच मी त्याबद्दल बोलत नाहीये. मी तुला किती वर्षांपासून ओळखतो? आणि मी तुझ्याशी किती वर्षे बोललो नाही? आणि नंतर आपण एकत्र काम करायला सुरुवात केली तेव्हा काय घडलं? १५ वर्षे झाली. पण मी तुझ्याशी किती वर्षे बोललो नव्हतो. जेव्हा मी तुझ्यासाठी बोलत होतो, तेव्हा तुला समजलं नाही. दोघांपैकी एक भाऊ पुढे गेला आणि एक मागे राहिला. हेच तुला सांगत होतो. अमाल, तुझं मन खंबीर कर. आता ही तुझी वेळ आहे, पुढे कसं जायचं ते तू ठरव,” असं सलमान खान अमालला म्हणाला.
सलमान पुढे अमालला सल्ला देत म्हणाला, “अमाल, तुझी क्षमता वाया घालवू नकोस. हा सर्वात मोठा शो आहे. अरमान, डब्बू किंवा तुझ्या आईसह इतर सगळेच तुला २४/७ पाहत आहेत. मला तू जिंकून नाही तर एक व्यक्ती म्हणून बदलून, या शोमधून बाहेर यावंस, असं वाटतं.”