Sankarshan Karhade’s Children Watch Mahavatar Narsimha Movie : ‘महावतार नरसिम्हा’ हा ॲनिमेटेड चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा चालू आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे परमभक्त प्रल्हाद यांची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. ही कथा सिनेमात ज्या भव्यतेने सादर केली गेली आहे, ती खरंच अद्वितीय आहे. ‘महावतार नरसिम्हा’मध्ये भगवान विष्णूचे अवतार ज्या पद्धतीने दाखवले आहेत, ते पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो, अनेकजण भावुक झाल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खरंतर, या सिनेमाला प्रदर्शित झाल्यावर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र, त्यानंतर प्रेक्षकांना या सिनेमाचं कथानक जसं समजलं, सोशल मीडियावर व्हिडीओ झाले तशी ‘महावतार नरसिम्हा’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होऊ लागली. या सिनेमाने त्यानंतर रेकॉर्डब्रेकिंग कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘महावतार नरसिम्हा’ ॲनिमेटेड असल्याने लहान मुलांना देखील विशेष आवडला.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नुकताच त्यांच्या दोन्ही मुलांसह थिएटरमध्ये जाऊन ‘महावतार नरसिम्हा’ हा भव्य सिनेमा पाहिला आणि आता अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सिनेमाबद्दल आणि विशेष म्हणजे त्याच्या मुलांना सिनेमा पाहून काय वाटलं याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

संकर्षण कऱ्हाडे म्हणतो, “सुप्रभात… काल माझ्या मुलांनी थिएटरमध्ये जाऊन ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट पाहिला. वेड लागलंय त्यांना या सिनेमाचं…घरी आल्यापासून “ओम् नमो भगवते वासूदेवाय नमः”चा आरडाओरडा करत जप चालू आहे… त्यांना २ गोष्टी समजल्या आहेत म्हणे… त्यातील पहिली गोष्ट म्हणजे चांगलं वागलं की नरसिम्हा रक्षण करतो आणि दुसरी अलकाल करु नये कारण, देव आपल्यापेक्षा हुशार असतो! (अलकाल म्हणजे अहंकार ) मी त्यांच्या आईला म्हणालो “तुला काय आवडलं या सिनेमातलं?” ती म्हणाली “२ तास पोरं शांत होती हे खूप आवडलं…”

दरम्यान, संकर्षणच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्स करत प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. “सगळ्यात बेस्ट त्यांच्या आईने दिलेलं उत्तर आहे”, “तुम्ही बरं झालं इतका सुंदर सिनेमा मुलांना दाखवलात”, “किती गोड फोटो आहेत”, “खरंच सुंदर चित्रपट आहे”, “आता आपल्या मराठीत येणाऱ्या दशावतार सिनेमाला पण सगळ्यांचा हाच प्रतिसाद मिळायला पाहिजे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.