Sankarshan Karhade’s Wife Praises Him : संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्यानं मालिका, नाटकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या अभिनेता रंगभूमीवरील नाटकामुळे चर्चेत आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. अशातच आता त्याची पत्नी शलाका कऱ्हाडेनंही त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे.

संकर्षणची पत्नी शलाकानं नुकतीच मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिला संकर्षणचं आवडलेलं काम कोणतं याबद्दल विचारण्यात आलेलं. शलाकानं यावेळी संकर्षणच्या नाटकातील कामाचं कौतुक करीत त्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. शलाकानं यावेळी संकर्षणच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचं कौतुक केलं आहे.

संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीने केलं कौतुक

नवऱ्याच्या कामाबद्दल ती म्हणाली, “त्याचं आता जे ‘कुटुंब किर्रतन’ नाटक सुरू आहे. ते मी बघायला गेले होते आणि त्याचं लिखाण, गोष्ट सगळं मला माहीत होतं; पण त्यातील संकर्षणचं काम पाहून आणि त्यातील त्याचं कीर्तन मला खूप आवडलं. तो प्रयोग संपल्यानंतर मी त्याला एवढंच म्हटलं की, आज मला तुला सांगावंसं वाटतं की, मी तुझी मोठी फॅन झाले आहे. त्याची सगळीच कामं मला आवडतात. पण, या नाटकात त्यानं जे लिहिलं आहे, ते एखाद्या कीर्तनकारानं किंवा प्रवचनकारानं लिहिलंय, असं वाटतं. इतकं छान त्यानं लिहिलं आहे. खूप सुंदर नाटक आहे. लोकांना आवडतंय ते.”

शलाकाला यादरम्यान, संकर्षण अनेक कविता करतो. तर त्यानं केलेली कोणती कविता तुला आवडते, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “त्यानं आमच्या मुलांवर कविता केली होती. ती कविता मला खूप आवडते कधीही ऐकली तरी भावुक व्हायला होतं.” शलाकानं मुलाखतीत पुढे संकर्षणनं आजवर “माझ्यावर कधीही कविता केली नाही” सांगत गोड तक्रार केली आहे.

दरम्यान, संकर्षण व शलाका यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर या दोघांचं अरेंज मॅरेज असून, दोघे दोन जुळ्या मुलांचे आई-बाबा आहेत. संकर्षणप्रमाणे शलाकालाही कलेची आवड असून, लहानपणापासून ती चित्रकला करीत आली आहे आणि त्यातच तिनं पुढे शिक्षण घेतल्याचं म्हटलं आहे.