Shalaka Karhade Talks About Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने मालिका, नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या संकर्षण रंगभूमी गाजवत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत तो अनेक नाटकांतून प्रेक्षकांसमोर येत आहे. अशातच आता त्याची अर्धांगिनी शलाका कऱ्हाडेने त्याच्या नाटकाबद्दलची एक आठवण सांगितली आहे.
शलाकाने नुकतीच ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिला “परभणी ते मुंबई असा प्रचंड संघर्षाचा प्रवास करत आज संकर्षण यशाच्या शिखरावर उभा आहे, पण हे यशाचं शिखर गाठत असताना अनेक आव्हानं आली असतील; यादरम्यान तुझा सहभाग यामध्ये कसा होता?” असं विचारण्यात आलेलं. शलाका यावर म्हणाली, “आमचं लग्न झालं तेव्हा तो थोडा संघर्ष करत होता, पण त्याने एक नाटक लिहिलेलं आणि त्याने ते नाटक मला लग्नाच्या आधी ऐकवलेलं.”
शलाका याबद्दल पुढे म्हणाली, “त्याने फोनवर मला ते नाटक ऐकवलेलं. तो म्हणालेला की, हे मी नाटक लिहिलं आहे आणि मला ते व्यावसायिक रंगमंचावर आणायचं आहे. मला त्यावेळी यातलं फार काही कळायचं नाही. नंतर खूप बदल झाले त्या नाटकात, तो परत परत ते लिहित गेला आणि तीन वर्षं त्याने खूप निर्मात्यांना ती स्क्रिप्ट ऐकवली, पण त्याचं काही घडलं नाही, त्यावेळी तो खचून जायचा की मी खूप वाइट लिहितोय का? त्यात काही दर्जेदार वाटत नाहीये का? तेव्हा आमच्या घरातील सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिला की तू खचून जाऊ नकोस, तू प्रयत्न कर.”
संकर्षण कऱ्हाडेने पत्नीकडून लिहून घेतलेली नाटकाची स्क्रिप्ट
शलाका ती आठवण सांगत पुढे म्हणाली, “तो मला म्हणायचा, तुझं अक्षर छान आहे, माझं वाईट आहे, त्यामुळे तू ती स्क्रिप्ट तुझ्या अक्षरात लिहून दे; तर मी ती स्क्रिप्ट माझ्या अक्षरात लिहून दिली होती आणि नंतर प्रशांत दामले यांनी त्या नाटकाची निर्मिती केली. संकर्षणने त्यात मुख्य भूमिका साकारली, ते नाटक म्हणजे ‘तू म्हणशील तसं’ आणि आज त्या नाटकाचे ४०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. तर त्याचा तो संघर्ष मी पाहिला आहे, पण त्याला तो सामोरे गेला.”
दरम्यान, संकर्षणच्या पत्नीबद्दल बोलायचं झालं तर, शलाकाने या मुलाखतीत तिलासुद्धा कलेची आवड असून ती एक चित्रकार आहे तिला आधीपासूनच चित्रकला आवडते असं म्हटलं आहे.