Prapti Redkar Shares Experience Of Shooting With Horse: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका अल्पावधीतच मोठी लोकप्रिय ठरली. सारंग व सावलीच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं लग्न ते मैत्रीपर्यंतचा प्रवास चाहत्यांना आवडला.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच अस्मीचा बॉयफ्रेंड आकारच्या धमक्यांना घाबरून सावलीने सारंगला घटस्फोट दिला होता. आकारने सावलीला सारंगला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे तो अस्मीच्या सांगण्यावरून करत होता. सावलीने सारंगला घटस्फोट दिल्यानंतर तिलोत्तमाने लगेच सारंग व अस्मीचे लग्न ठरवले.
यादम्यानच, सावलीला अस्मीचे सत्य समजले. सारंग व अस्मीचे लग्न सुरू असताना सावली घोड्यावरून तिथे पोहोचली आणि सर्वांसमोर अस्मीचे सत्य उघड केले. त्यानंतर सारंगने सर्वांसमोर सावलीविषयी त्याचे प्रेम व्यक्त केले.
“नऊवारी साडी, नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर अन्…”
आता सावली म्हणजे अभिनेत्री प्राप्ती रेडकरने या सीनचे शूटिंग करताना काय अनुभव आला याबद्दल वक्तव्य केले आहे. प्राप्ती म्हणाली, “जेव्हा मला कळालेलं की सेटवर घोडा येणार आहे, तेव्हापासून मी उत्साही होते. त्यात मला नऊवारी साडी नेसून घोडेस्वारीचा सीन पूर्ण करायचा होता. हे ऐकल्यावर मला थोडी काळजी वाटत होती, कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी हे करणार होते. माझ्या आई-बाबांनी माझा आत्मविश्वास वाढवला. मला सेटवरच घोडेस्वारीची ट्रेनिंग दिली गेली.
“मला दिग्दर्शक सरांनी विचारलेलं की, तुला बॉडी डबलची गरज आहे का? तेव्हा हा सीन मी स्वतः करणार, असं त्यांना सांगितलं. नऊवारी साडी, नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि मेक-अप उन्हात सांभाळून घोडेस्वारी करणं आव्हानात्मक होतं. पण, आमचे सीन्स व्यवस्थित शूट झाले.
“जेव्हा सेटवर घोड्याची एन्ट्री झाली तेव्हा मला कळाले की, तो घोडा नाही तर घोडी आहे आणि तीचं नाव रज्जो आहे. मी सीन्समध्ये तिच्याशी गप्पा मारत होते. मी बोलत होते आणि ती ऐकत होती. मी रज्जोच्या प्रेमात पडले. सीनमध्ये तिला ऊन लागत होतं, तेव्हा तिला सावली मिळेल याची मी काळजी घेत होती. आमच्यात कमी वेळात घट्ट नातं निर्माण झालं होतं. कलाकार म्हणून अनेक वेगळ्या गोष्टी मला करण्याचा अनुभव मिळतो”, असे म्हणत घोडेस्वारीच्या सीनचा अनुभव प्राप्तीने सांगितला.
दरम्यान, सारंगने सावलीला पत्नी म्हणून स्वीकारलं आहे. तो वेळोवेळी तिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसतो. मात्र, त्याच्या आईने तिलोत्तमाने अजूनही सावलीला सून म्हणून स्वीकारले नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.