Savlyachi Janu Savali Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ‘सारंग व सावली यांच्यामध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं असून प्रत्येक परिस्थितीत दोघे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळतं. पण, सध्या मालिकेत या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची म्हणाजेच शिवानीची एन्ट्री झाली असून, ती या दोघांच्या संसारात विघ्न आणण्याचा प्रयत्न करताना दिसते. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

शिवानी सारंगबरोबर नवीन ब्रँडच्या निमित्ताने काम करीत असते आणि बराच वेळ ती मेहेंदळे कुटुंबाबरोबर असते. यावेळी ती अनेकदा सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते परंतु, सावली तिचं वागणं पाहत असते आणि आता सावली चक्क तिच्या सौभाग्याचं संरक्षण करण्यासाठी शिवानीला ताकीद देते, असं समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.

सावली देणार शिवानीला सारंगपासून लांब राहण्याची ताकीद

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत तिलोत्तमा शिवानीला त्यांच्या घरी नवमीनिमित्त जेवणाचं आमंत्रण देते. त्यासाठी शिवानी मेहेंदळेंच्या घरी येते आणि तिचं त्यानिमित्तानं सगळे स्वागत करतात. अशात आता समोर आलेल्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये मेहेंदळे कुटुंबीयांच्या घरी एक खेळ खेळला जात असून, त्यावेळी शिवानीदेखील उपस्थित असते आणि ती सारंगबरोबर खेळ खेळताना दिसते. परंतु, त्यादरम्यान ती सारंगबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असते आणि हे सावली पाहते.

प्रोमोमध्ये शिवानी सारंगबरोबर खेळ खेळत असताना सावली तिथे जाते आणि तिचा हात धरून तिला खोलीत घेऊन येते आणि धक्का देते. सावली यावेळी शिवानीला, “सारंगसरांना मिळवण्याचं तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही,” असं म्हणते. त्यावेळी शिवानी तिला “हे बघ…” म्हणत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते; पण सावली तिच्यावर हात उगारताना दिसते. सावलीचं हे रूप पाहून शिवानी घाबरलेली दिसते. सावली पुढे म्हणते, “कारण- तो माझा नवरा आहे.”

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत आता ट्विस्ट येणार असून, एरवी शांत, सोज्वळ असणारी सावली आता मात्र तिच्या सौभाग्याचं संरक्षण करण्यासाठी आणि शिवानीला सारंगपासून दूर करण्यासाठी तिला ताकीद देताना दिसतेय. त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात सावली शिवानीला कसा धडा शिकवणार आणि नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.