Shashank Ketkar Video : मराठी मालिका तसंच चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेला हा अभिनेता त्याच्या सोशल मीडियाद्वारे सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर कायमच आवाज उठवताना दिसतो. तसंच शशांकनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांची प्रशासनाकडूनही अनेकदा दखल घेतली गेली आहे. दोन दिवसांपूर्वी शशांकने मालाडच्या मढमधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा व्हिडीओ शेअर केला होता.
मढ आयलंडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी दोन झाडे आहेत. या झाडांबद्दल शशांकने व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. या व्हिडीओमधून त्याने झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसंच हा भ्रष्टाचार नव्हे, तर निष्काळजीपणा असल्याचं तो म्हणाला होता. त्याचबरोबर शशांकने या व्हिडीओमधून महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाकडे या झाडांना रिफ्लेक्टर लावण्याची मागणी केली होती.
शशांकने केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. याबद्दल स्वत: शशांकने माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी ही झाडे होती, त्या झाडांना रिफ्लेक्टर लावल्याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शशांक असं म्हणतो, “आपण आवाज उठवला, योग्य पद्धतीने तक्रार केली तर त्याकडे लक्ष दिलं जातं.” तसंच व्हिडीओद्वारे त्याने महानगरपालिका आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांना धन्यवाद म्हटलं आहे.
शशांक केतकर इन्स्टाग्राम व्हिडीओ
यानंतर तो असं म्हणतो, “मी परवा याबद्दल तक्रार केली होती आणि आज त्याबद्दल अॅक्शन घेण्यात आली आहे. यानिमित्ताने सुरुवात तरी झाली आहे असं मला वाटतं. दोन्ही झाडांना रिफ्लेक्टर लावले आहेत; पण मला खात्री आहे की, याहून चांगले रिफ्लेक्ट लवकरच लावले जातील किंवा या झाडांचा सोक्षमोक्ष तरी लावला जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद. बोलत राहा. आपला देश आहे आणि तो आपणच सुधारू शकतो.”
तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांक असं म्हणतो, “सरकार कोणाचंही असो, आपण या भारताचे नागरिक आहोत आणि चांगल्या वाईट गोष्टींसकट आपल्याला इथेच राहायचे आहे. त्यामुळे बोला. जे आत्ता किंवा त्या त्यावेळी सरकारमध्ये असतील त्यांनी आपली दखल घेणं आणि अॅक्शन घेणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि सोयी पुरवल्यावर त्या नीट वापरणं ही आपली जबाबदारी आहे.”
यापुढे तो सर्वांना आवाहन करत असं म्हणतो, “आवाज उठवा! तक्रार नोंदवा! व्हिडीओ शूट करून तक्रार नोंदवणे हा मार्ग योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. पण काहीतरी करा.” दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या तक्रारीच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा झाली होती. याबद्दल त्याचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच त्याने मांडलेल्या समस्येवर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. याबद्दलही पुन्हा एकदा अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.